मुंबईकरांना ‘बारीशमे भी गरमी का एहसास’

येणारे काही दिवस ‘सप्टेंबर हिट’चे

पावसाच्या चांगल्या हजेरीने मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट गेल्याच आठवड्यात टळले. पण ऐन सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा प्रभाव मुंबईत जाणवू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. वाढलेले ऊन आणि आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ झाल्याने मुंबईकरांची अस्वस्थता वाढली आहे. पण येत्या काही दिवसांसाठी सुर्याचा हा चढलेला पारा कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. येत्या चार ते पाच दिवसांपर्यंत उन्हाचा पारा कायम राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने वर्तवला आहे.

मुंबईकर गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये उकाड्यात वाढ झाल्याचे वातावरण अनुभवत आहेत. अचानक वातावरणातील तापमानात आणि आर्द्रतेमध्ये झालेल्या वाढीमुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. परिणामी पावसाच्या हजेरीवरही त्याचा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी सोडली तर अनेक भागांत कडाक्याचे ऊन पडल्याचे मुंबईत दिसून येत आहे. पण अशा वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. येत्या काही दिवसांमध्येही असेच वातावरण कायम राहणार असल्याने मुंबईकरांनी अशा वातावरणात काळजी घेणे अपेक्षित आहे. हवामानातील बदलामुळे मुंबईतील तापमानात वाढ दिसून आलेली आहे.

सरासरीपेक्षाही अधिक तापमानात वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या 4-5 दिवसात कमी पाऊस, दिवसा लख्ख ऊन, संध्याकाळी ढगाळ आकाश, गडगडाटासह पाऊस असून, त्याचा एकत्रित परिणाम जाणवत आहे, असे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. मुंबई शहरात आणि उपनगरात काही ठिकाणी पावसाची तुरळक हजेरी लागू शकते असेही ते म्हणाले. आज शनिवारी मुंबईत कमाल तापमान ३३ डिग्री सेल्सिअस इतके होते. तर किमान तापमान हे २५ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. मुंबई उपनगरात तसेच शहरात तुरळक पावसाची नोंद गेल्या २४ तासांमध्ये झाली आहे.