घरमहाराष्ट्रवसुंधरा दिन : बदलापूरमधील तरुण संशोधकाचे हरित तंत्रज्ञानात पुढचे पाऊल

वसुंधरा दिन : बदलापूरमधील तरुण संशोधकाचे हरित तंत्रज्ञानात पुढचे पाऊल

Subscribe

भविष्यात अपरिहार्य ठरणाऱ्या हरित रसायनशास्त्र याविषयी मुळचे बदलापूर येथील तरुण संशोधक डॉ.सौरभ पाटणकर यांनी प्रयोगशाळा सुरू केली आहे

दर्जेदार तंत्रशिक्षण आणि संशोधनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुंबईस्थित रसायन तंत्रज्ञान संस्थेने (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी) इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या ५०० कोटी रूपयांच्या निधीतून भुवनेश्वार येथे विविध विज्ञान शाखेतील मुलभूत संशोधनासाठी एक अभ्यासकेंद्र स्थापन केले आहे. त्यात भविष्यात अपरिहार्य ठरणाऱ्या हरित रसायनशास्त्र याविषयी मुळचे बदलापूर येथील तरुण संशोधक डॉ.सौरभ पाटणकर यांनी प्रयोगशाळा सुरू केली आहे. या प्रयोगशाळेत हरित तंत्रज्ञान (ग्रीन टेक्नोलॉजी), उत्प्रेरकाच्या मदतीने रासायनिक प्रक्रिया ( कॅटॅलायसीस) आणि जैविक पदार्थ मूल्यवृद्धी (बायोमास वॅलरायझेशन) या विषयांमध्ये संशोधन केले जाते.

अलिकडेच भारतीय पेटंट कार्यालयाने ऑक्सो अल्कोहोल सिंथेसीस या विषयातील डॉ. सौरभ पाटणकर आणि प्रा. गणपती यादव यांचे पेटंट मंजुर केले. त्याशिवाय लिगनीन हा झाडांपासुन मिळणारा जैविक पदार्थ, जो सध्या कचरा म्हणुन जाळला जातो, त्यापासुन कुठलेही उत्सर्जन होऊ न देता वॅनिलीनसारखे मौल्यवान रसायन बनवण्याची प्रक्रिया त्यांनी विकसित केली आहे. रॉयल सोसायटी ऑफ केमेस्टीच्या ग्रीन केमेस्ट्री नियतकालिकाने त्याची दखल घेत त्यांचा या विषयावरील लेख प्रकाशित केला.

- Advertisement -

डॉ. पाटणकर यांचे यासारख्या विषयांमधील संशोधन लेख अमेरिकन केमिकल सोसायटी, एल्सवियर, स्प्रिंगर यासारख्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशीत झाले आहेत. डॉ पाटणकर यांनी यापूर्वी केलेल्या अतिसूक्ष्म काष्टतंतू (नॅनो सेल्युलोज) विषयातील संशोधनामुळे वैद्याकीय उपचारांसाठी लागणारी साधने कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकणार आहेत. आता शेतीतून निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून जीवनोपयोगी रसायने तयार करण्याचे संशोधन त्यांनी सुरू केले आहे. त्यांची ही रसायने पल्प, कागद निर्मिती आणि रसायन उद्योगात वापरता येतील. सध्या शेतात तयार होणारा झाडपाला जाळून टाकला जातो. या संशोधनामुळे त्याला मोल येणार असून शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळू शकेल, असा विश्वास डॉ. सौरभ पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.

तरुण संशोधकांना संधी

भुवनेश्वारयेथील हरित रसायनशास्त्र प्रयोगशाळेविषयी इत्यंभूत माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे अनावरण अलिकडेच डॉ. सौरभ पाटणकर यांनी केले. पेट्रोलियम आणि प्लॅस्टिकच्या गैरवापरातून होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपायांवर अगदी सोप्या शब्दात माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या प्रयोगशाळेत रासायनिक अभियांत्रिकी (केमिकल इंजिनिअरिंग), हरित तंत्रज्ञान (ग्रीन टेक्नॉलॉजी), ऊर्जा अभियांत्रिकी ( एनर्जी इंजिनिअरिंग) पेट्रो केमिकल इंजिनिअरिंग आणि शेतीरासायनिक अभियांत्रिकी (अ‍ॅग्रो केमिकल इंजिनिअरिंग) या अभ्यासक्रमात एम. टेक आणि पीएच.डीसाठी संशोधन शिष्यवृत्तीसह करता येईल. प्रवेशासंबंधीची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -