घरमहाराष्ट्रपालघर जिल्ह्यातील 190 शाळा बंद करण्याचे आदेश

पालघर जिल्ह्यातील 190 शाळा बंद करण्याचे आदेश

Subscribe

18 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

पालघर जिल्ह्यातील 190 अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिल्यामुळे सुमारे 18 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य ऐन शाळा सुरू होण्याच्या वेळीच धोक्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा, वसई, पालघर, वाडा, जव्हार, तलासरी, डहाणू, विक्रमगड या तालुक्यातील 190 शाळांनी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 18 चा भंग केल्यामुळे दोन दिवसांत या शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले आहेत. या अनधिकृत 190 शाळांमध्ये सर्वात जास्त 150 शाळा एकट्या वसई तालुक्यात आहेत. त्या खालोखाल 17 पालघर, 11 वाडा, 2 तलासरी,3 डहाणू, 5 विक्रमगड आणि जव्हार आणि मोखाडा तालुक्यात प्रत्येकी एकेक शाळांचा समावेश आहे.

- Advertisement -

नर्सरी ते 10 पर्यंतच्या तुकड्या या शाळांमध्ये आहेत. त्या-त्या तालुक्यातील गट शिक्षणाधिकार्‍यांमार्फत शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश पालकांनी घेऊ नये, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती संजय म्हात्रे, गटविकास अधिकारी बी.एन.जगताप आणि गट शिक्षणाधिकारी एम.सी.तांडेल यांनी केले आहे.

या 190 अनधिकृत शाळांमध्ये एकूण 17 हजार 684 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 13 हजार 824 विद्यार्थी वसई तालुक्यातील आहेत. जून महिन्याच्या 15 तारखेला शालेय शिक्षणाला सुरुवात होणार आहे. प्रत्यक्षात मात्र, या महिन्याच्या सुरुवातीला शाळांमध्ये प्रवेशाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नर्सरीचे प्रवेश फेब्रुवारीमध्येच फुल्ल झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने काढलेला शाळा बंदीचा हा आदेश वराती मागून घोडे धावल्याचा प्रकार असल्याची टिका पालक वर्गात केली जात आहे.

- Advertisement -

या शाळा बंद झाल्यानंतर 18 हजार विद्यार्थी शिक्षणाला मुकणार आहेत. त्यामुळे बंदीचा निर्णय घेण्यापूर्वी पालक आणि शाळा व्यवस्थापनाला पूर्वसूचना देणे आवश्यक होते.असाही सूर पालक वर्गात उमटला आहे. तर या शाळा व्यवस्थापनाला वारंवार सूचना देऊनही नियमांची पूर्तता करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -