अंगणवाडी इमारतीची दुर्दशा!

Mumbai
गॅस सिलिंडरमुळे अपघाताचे भय

कर्जत तालुक्यातील वारे अंगणवाडी केंद्राची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली असून, याबाबत वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यात तेथे शिकणार्‍या चिमुकल्यांचे मात्र हाल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या अंगणवाडीतच पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस शेगडी लावली जात असल्याने दुर्घटनेची शक्यता पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

ही इमारत 28 वर्षे जुनी असून, 1991 साली बांधण्यात आली आहे. या केंद्रात गावातील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालके पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहेत. याशिवाय 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांचीही या केंद्रामार्फत नियमित देखरेख केली जाते. परंतु या इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने अपघाताची टांगती तलवार तेथील सर्वांवर आहे. खिडक्या तुटल्याने पावसाचे पाणी आत शिरून वर्ग खोलीत पसरते. दरवर्षी प्लास्टिकच्या सहाय्याने तात्पुरता इलाज केला जातो. परंतु त्याचा काही उपयोग होत नाही. दरवाजाचीही अवस्था काहीशी अशीच आहे.

विशेष म्हणजे मुख्य दरवाजाबाहेरच गावातील रहदारीचा रस्ता असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. खेदाची बाब म्हणजे मुलांचा पोषण आहार शिजविण्यासाठी अन्य जागा नसल्याने केंद्रातच खिचडी शिजवली जाते. मुलांना खेळण्याच्या मोकळ्या जागेअभावी स्वयंपाकाच्या ठिकाणीच गॅस सिलंडर जवळ चिमुकली मुले खेळताना दिसतात. अशीच स्थिती तालुक्यातील इतर अंगणवाडी केंद्रांचीही आहे. काही ठिकाणी तर इमारतीअभावी मुलांना मंदिरात किंवा अन्य ठिकाणी बसविल्याचे निदर्शनास येते. नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीत पोषण आहार शिजविण्याची व्यवस्था आहे. तरी 20-25 वर्षे जुन्या इमारतीत पोषण आहार शिजविण्याकरिता स्वतंत्र जागा नाही. एकतर वर्गातच आहार शिजविला जातो किंवा सेविका आपल्या घरून तो शिजवून आणतात.

या संदर्भात वारे अंगणवाडी सेविका रेखा म्हसे यांनी स्थानिक ग्रामपंचायत, तसेच वरिष्ठ कार्यालयास निवेदनाद्वारे कळविले असून, पोषण आहार शिजविण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करून इमारतीची दुरुस्ती तातडीने करावी, अशी विनंती केली आहे. शासन अंगणवाडी केंद्रांसाठी स्मार्ट उपाययोजना राबवित असले तरी मूलभूत सुविधांपासून मात्र बालकांना वंचित ठेवले जात आहे.

पूर्वी तालुक्यात बालवाडी केंद्र चालविले जात असे. त्याचे रूपांतर अंगणवाडी केंद्रात झाल्याने सुरूवातीला इमारतीत आहार शिजविण्यास वेगळी जागा नव्हती. परंतु नव्याने बांधलेल्या इमारतींमध्ये स्वतंत्र स्वयंपाकगृह बांधण्यात आले आहे. ज्या केंद्रात सुविधा नाही त्यांना पोषण आहार वेगळ्या ठिकाणी शिजविण्यास सांगितले जाईल.
– निशिगंधा भवाळ, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास, कर्जत