घरCORONA UPDATEपीपीई किट आता मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार - अजोय मेहता

पीपीई किट आता मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार – अजोय मेहता

Subscribe

आता मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा पीपीई किट उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आपलं महानगरला दिली.

पीपीई किट हे कोरोनाला रोखण्यासाठी आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी लढणार्‍या डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी आवश्यक असल्याने आता मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा पीपीई किट उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आपलं महानगरला दिली. साधारणपणे पीपीई किट बनवायला एन ९५ मास्कसहीत ३३० रुपये खर्च येत असल्याने किमान ४०० रुपयांपर्यंत पीपीई किट उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा विचार असल्याचे समजते.

पीपीई किट हे पहिल्यांदा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील काही निवडक मेडिकल स्टोअर्समध्ये देण्यात येतील आणि पुढील काही दिवसांत राज्यातील प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये पीपीई किट मिळतील. याबाबतची ठोस अमलबजावणी करण्यासाठी धोरण आखण्यात येत असून आठवड्याभरात पीपीई किटची कमतरता कुणालाच भासणार नाही असा दावाही मेहता यांनी केला.

- Advertisement -

ज्याप्रमाणे आपण सॅनिटायझरच्या किमती केंद्र सरकारच्या गाईडलाइननुसार २५० रूपये प्रमाणित केल्या त्याचप्रमाणे पीपीई किटची किंमतही प्रमाणित करण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यातील अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार असून, पीपीई किटचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विक्रेते आणि पुरवठादार यांच्यात समन्वय साधण्याचे काम सहाय्यक आयुक्त करणार असल्याचेही मेहता म्हणाले.

राज्यसरकारने सर्व रूग्णालयांना पीपीई किट मोफत देण्याचा निर्णय घेतला असून, रुग्णांना यापुढे पीपीई किटचे पैसे भरावे लागणार नाहीत असा दावाही अजोय मेहता यांनी केला. तसेच मुंबईतील प्रत्येक वॉर्डातील खासगी क्लिनिकमध्ये काम करणार्‍या डॉक्टर आणि कम्पाउंडर यांनाही आठवडाभर पुरेल एवढे पीपीई किट दिले आहेत. त्यामुळे खासगी प्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टरांनी घाबरून जावू नये. दवाखाने उघडे करुन रुग्णांना तपासावे असे आवाहनही मेहता यांनी आपलं महानगरशी बोलताना केले.

- Advertisement -

खासगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा दर रुग्णांकडून आकारले जात होते. त्यामुळे कोरोना रुग्णांचे होणारे हाल, परवड पाहता राज्यसरकारने बेडचे दर हे ४५००, ७००० आणि ९००० असे निश्चित केले आहेत. यापेक्षा दर कोणतेही रुग्णालय आकारत असेल तर त्याची तक्रार १९१६ क्रमांकावर करावी. ज्या पद्धतीने बेडचे दर निश्चित केले त्याचप्रमाणे पीपीई किटचे दर निश्चित करुन दिले जातील. जे दर दिले जातील तेवढेच दर पीपीई किटसाठी नागरिकांनी द्यावेत असेही मेहता म्हणाले.

सर्वसाधारणपणे एका पीपीई किटसाठी ३३० रुपये खर्च येत असल्याने राज्यसरकार पीपीई किटची किंमत किती ठेवणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आजही खुल्या बाजारात पीपीई किट हे १५०० रुपये ते २५०० रुपयापर्यंत विकले जातात. पण यापुढे सलून,  इलेक्ट्रीकल, प्लंबर आणि इतर लघुउद्योजकांनाही पीपीई किटस घालणे आवश्यक होणार असल्याने सर्वसामान्यांना परवडेल अशा वाजवी भावात पीपीई किट उपलब्ध करुन दिले जातील असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. पीपीई किटचा खर्च आणि इतर गोष्टी बघता किमान ४०० रुपयांपर्यंत पीपीई किट उपलब्ध होतील असेही त्या अधिकार्‍याने सांगितले.


हे ही वाचा – पडद्यामागच्या कलाकारांना तरूण रंगकर्मींची साथ!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -