घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात वाढतेय 'डायबिटीक फूट'ची समस्या

महाराष्ट्रात वाढतेय ‘डायबिटीक फूट’ची समस्या

Subscribe

महाराष्ट्रात ६० टक्के लोक हे डायबिटीसने त्रस्त आहेत. त्यातील ३० टक्के लोकांना पायांचा त्रास होतो. तर, भारतात दर २० सेकंदाला एका डायबिटीस व्यक्तीचा पाय कापावा लागतो.

मानवी जीवनात पायांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण, नेहमीच त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आपण दर दिवशी साधारणत: आठ ते दहा हजार पावलं चालतो. पण, असं जरी असलं तरी डायबिटीक रुग्णाची राजधानी असलेल्या भारतातील २५ टक्के रुग्णांना पायांची जळजळ, पाय थंड पडणं, पायात तीव्र वेदना, पायांच्या संवेदना कमी होणं असे विकार आपोआपच जडतात. त्यामुळे डायबिटीक रुग्णांनीच नाही तर प्रत्येकाने आपल्या शरीरासोबत पायांचीही काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन डॉक्टर करतात.

…अन्यथा पाय कापावा लागतो

मधुमेही रुग्णांना अनेकदा पायाला लागल्यानंतर त्यांच्या संवेदना जर नाही जाणवल्या तर त्याजागी ग्रँग्रिन होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत रुग्णावर पाय कापण्याची वेळ सुद्धा ओढावू शकते. यासाठी राज्याच्या आरोग्य संचालनालयातर्फे पायांची मोफत तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच राज्याच्या अनेक जिल्हा रुग्णालयात ‘डाबस्टर पोडियाट्रीक क्लिनिक’ सुरू करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव ‘डाबस्टर पोडियाट्रीक क्लिनिक’ कडून सरकारच्या आरोग्य विभागाला पाठवण्यात आला आहे. ज्याच्या फायदा डायबिटीक आणि सामान्य रुग्णांना होऊ शकणार आहे. सरकारकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे पण, आजही लोकांमध्ये आणि डॉक्टरांमध्ये कमी प्रमाणात असलेल्या जागृतीमुळे सध्या प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प सुरू होणार आहे.

- Advertisement -

राज्यात डायबिटीक फूटचं प्रमाण किती ?

महाराष्ट्रात ६० टक्के लोक हे डायबिटीसने त्रस्त आहेत. त्यातील ३० टक्के लोकांना पायांचा त्रास होतो. तर, भारतात दर २० सेकंदाला एका डायबिटीस व्यक्तीचा पाय कापावा लागतो. म्हणजेच डायबिटीसमुळे पायांना त्रास होण्याचं प्रमाण भारतासह महाराष्ट्रात ही जास्त असल्याचं ऑर्थोटिस्ट डॉ. भूषण हेमाडे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात डायबिटीसमुळे पायांना होणाऱ्या जखमांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सरकारच्या आरोग्य विभागालाही याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार, सरकारकडून राज्यातील ४ जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पाय तपासणीचा उपक्रम राबवण्याची परवानगी दिली आहे. ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर या हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम मोफत राबवण्यात येणार आहे. त्यापैकी ठाणे जिल्हा रुग्णालयात लवकरच हा कार्यक्रम राबवला जाईल. आठवड्यातून एकदा ओपीडी बेसवर या रुग्णालयांत पायांची तपासणी केली जाणार आहे. त्यासोबतच संपूर्ण राज्यातील सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांनाही याबाबत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. येत्या २ महिन्यात पॉर्टेल वेबवर हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डायबिटीक फूटबद्दलची जनजागृती होण्यास मदत होणार आहे.
– डॉ. भूषण हेमाडे, क्लिनिकल ऑर्थोटिस्ट, डाबस्टर पोडियाट्रीक क्लिनिक

- Advertisement -

तर, राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाचे सहाय्यक संचालक डॉ. के.आर.खरात यांनी सांगितलं की, “डाबस्टर पोडियाट्रीक क्लिनिक या संस्थेने आम्हाला पाय तपासणी केंद्रांबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यानुसार, त्यांना चार जिल्हा रुग्णालयात हा उपक्रम राबवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण, हा उपक्रम सध्या प्रायोगिक तत्त्वावर असणार आहे. या तपासणी केंद्राचा फायदा झाला तर पूर्णपणे ही केंद्र सुरू करण्यात येतील.”

केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुरु 

डाबस्टर पोडियाट्रीक क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर हेगिष्टे यांनी सांगितलं की, “सध्या मुंबईसह महाराष्ट्रात आणि जगात ही डायबिटीसमुळे पायांना जखमा होऊन पाय कापण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे असे छोटे पाय तपासणी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. हॉस्पिटलमध्ये असे केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयालाही पत्र पाठवलं आहे. त्यांच्याकडून ४ जिल्हा रुग्णालयात हा उपक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आमच्या क्लिनिकमध्ये दररोज ७ ते ८ लोक पायाच्या तक्रारी घेऊन येतात. आवश्यकतेनुसार, त्यांना शूज देखील तयार करून दिले जातात. जेणेकरून रुग्णांचे पाय व्यवस्थित राहतील.”

ही आहेत आजाराची लक्षण –

  • चालताना पोटरी दुखणं आणि चालणं थांबल्यानंतर पोटरीचं दुखणंही थांबणं
  • पाय गार पडणं, पायाची त्वचा चमकदार होणं किंवा पाय काळे पडणं
  • रात्री झोपल्यानंतर पायांमध्ये असह्य वेदना होणं
  • पायाचा आकार बदलणं, शिरा आखडणं
  • घोट्याला जखम होणं

अशी घ्या पायांची काळजी –

  • पायाला जखम होऊ न देणं
  • धुम्रपान , तंबाखू खाणं टाळावं
  • पाय साफ ठेवावेत
  • पायांमध्ये काही बदल होत आहेत की नाही याचं रोज निरीक्षण करावं
  • पाय गरम पाण्याने धुऊन स्वच्छ ठेवा. जास्त वेळ पाय पाण्यात ठेऊ नका
Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -