बाजारात लाल मिरच्यांच्या दरात भडका

मिरच्यांचे घाऊक बाजारात ३० रुपयांनी दरात वाढ तर किरकोळमध्ये किलोच्या दरात ४० रूपयांची वाढ झाली आहे.

Pune
the rate of red chillies increased in market

मागील काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र कोसळलेल्या पावसाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. या पावसात लाल मिरच्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मिरच्यांच्या पीकाचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी मिरच्याच भिजल्या आहेत. त्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी घाऊक बाजारात क्विटलमागे ३०० रूपये, तर किरकोळ बाजारात किलोमागे ४० रूपयांची वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी वालचंद संचेती यांनी दिली.

मिरच्याचा तुटवडा कायम

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात मिरच्याच्या पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात लाल मिरच्यांचा तुटवडा जाणवत आहे. सर्वाधिक नुकसान कर्नाटकात झाले आहे. त्यामुळे आता पाऊस थांबला तरी पीकाचे तसेच मालाचे प्रचंड नुकसान झाल्याने येत्या काळातही जाणवणार आहे. तसंच मिरच्याचा तुटवडा कायम असणार आहे. त्यामुळे दरही तेजीत असणार आहेत. मिरच्याचे दर वाढल्याने त्यावर अवलंबून असणार्‍या गोष्टीचे दरही वाढणार असल्याचे संचेती यांनी नमुद केले.

विदेशातून मिरच्यांना मोठ्या प्रमाणात मागणी

आंध्र प्रदेशातील कोल्ड स्टोरेजमध्येही मालाचे प्रमाणही कमीच आहे. उत्पादन क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. पावसामुळे एकीकडे देशात मिरच्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे विदेशातून मिरच्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. तसेच राज्यासह देशातील मसाला उत्पादक कंपन्यांकडेही माल शिल्लक नसल्याने येत्या काळात विविध प्रकारच्या मसाल्यांचे दरही वाढणार असल्याचा अंदाज आहे. सद्य:स्थितीत घाऊक बाजारात मिरच्याच्या किलोच्या दरात ३० रूपये, तर किरकोळ बाजारातील दरात ४० रूपयांनी वाढ झाली असल्याचेही संचेती यांनी सांगितले.

मिरच्यांचे घाऊक बाजारातील किलोचे दर

तेजा – १८५ ते १९५
गुंटुर – १३५ ते १५०
ब्याडगी – १७५ ते २००
गुंटुर खुडवा – ७५ ते ८०
ब्याडगी खुडवा – ६५ ते ७०