घरदेश-विदेशखडसेंच्या पुनर्वसनासाठी भाजपत जोरदार हालचाली

खडसेंच्या पुनर्वसनासाठी भाजपत जोरदार हालचाली

Subscribe

अमित शहांच्या आग्रहाचा परिणाम

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या कोंडाळ्यात एकाकी पडलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय पुनर्वसनाची भाजपमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. खडसे यांना रिक्त होणार्‍या राज्यसभेचे सदस्यत्व द्यायचे की राज्य विधानपरिषदेवर पाठवून विरोधी पक्ष नेतेपदाची माळ त्यांच्या गळ्यात घालायची, याचा निर्णय दिल्लीस्तरावर लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर खडसे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत.

आपली साथ सोडून दोन्ही काँग्रेस पक्षांसह सरकार स्थापन करणार्‍या शिवसेनेला जेरीस आणण्यासाठी खडसे यांचा चांगला उपयोग होऊ शकतो, हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी परिषदेची जागा राखून ठेवण्याचा पहिला पर्याय ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे खडसेंच्या पुनर्वसनासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वत: आग्रही असल्याची माहिती मिळते.

- Advertisement -

मात्र प्रवीण दरेकर यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजही आग्रही असल्याने ती समस्या मिटताच शुक्रवारपर्यंत निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात भाजपची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती देण्यात आल्यावर त्यांनी एकनाथ खडसे यांचा पध्दतशीर काटा काढला. गजानन पाटील नावाच्या पीएला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याचे निमित्त करत फडणवीस यांनी खडसे यांच्याकडील मंत्रिपद काढून घेतले. पिंपरीतील एमआयडीसीतील भूखंडाच्या वितरणाचा ठपकाही खडसेंवर ठेवण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांच्या चौकशीतून खडसे यांना क्लिनचिट देण्यात आली.

- Advertisement -

यामुळे खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज होते. यातच विधानसभा निवडणुकीत खडसे यांना उमेदवारी नाकारून ती त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. खडसे यांच्यावरील अन्यायाला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचे खडसे उघडपणे सांगत होते. याविषयीची नाराजी गोपीनाथ गडावर आयोजित दसरा मेळाव्यात उघडपणे व्यक्त करण्यात आली होती. याच मेळाव्यात पक्षाच्या कोअर कमिटीतून बाहेर पडण्याचा इशारा पंकजा मुंडे आणि स्वत: खडसे यांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ता जाऊन ती महाविकास आघाडीकडे गेली. भाजपला दूर ठेवून सत्ता स्थापन करणार्‍या सेनेला येनकेन प्रकारेण अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपने गेल्या काही दिवसांपासून सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून खडसे यांचे पक्षात नव्याने पुनर्वसन करण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे सांगण्यात आले. खडसेंच्या पुनर्वसनासाठी पक्षनेते आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आग्रही आहेत. खडसेंसाठी राज्यसभेच्या येऊ घातलेल्या नियुक्तीतील एक जागा राखून ठेवण्याची तयारी पक्षाने चालवली होती.

मात्र दुसरीकडे खडसे यांना राज्य विधानपरिषदेत पाठवून त्यांच्या गळ्यात नव्याने विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी टाकून त्यांना सेनेवर सोडण्याचा प्रयत्न भाजप नेते करत असल्याचे संकेत दिले जात आहेत. सध्या या पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या खास आग्रहास्तव प्रवीण दरेकर यांच्याकडे देण्यात आली आहे. ती काढून घेऊन खडसेंकडे द्यायला स्वत: फडणवीस राजी नाहीत. मात्र हा विरोध दुर्लक्षून खडसे यांच्याकडे हे पद दिले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

मी आशावादी..
कुठेही प्रामाणिकपणे काम केल्यावर त्याचे फळ मिळणे हा निसर्गाचा नियम अहे. मी पक्षात राहून प्रामाणिक काम केल्याचे पक्षातल्या प्रत्येकाला ठावूक आहे. याचे फळ मिळत असेल तर आनंदच आहे. मी आशावादी आहे इतकेच..
– एकनाथ खडसे, भाजप नेते

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.

एक प्रतिक्रिया

  1. नाथाभाऊ शिवाय भाजपला पर्याय नाही कारण नाथाभाऊ हेच महाराष्ट्राचे नेते आहे
    लोकनेते..

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -