बाजिरे धरणालगतचा रस्ता खचला

ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण

Mumbai

एमआयडीसीच्या अखत्यारीतील येथील बाजिरे धरणाच्या बाजूने वझरवाडी गावाकडे जाणारा रस्ता 150 ते 200 फुटांपर्यंत खचला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे तेथे पडलेल्या भेगा वाढत चालल्या असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या रस्त्याला चार दिवसांपूर्वी भेगा पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र सूळ यांनी तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्यासह त्या भागाची त्वरित पाहणी केली. हा रस्ता त्यानंतर तातडीने बंद करण्यात आला. सद्यस्थितीत रस्ता अधिकच खचत चालला आहे. त्या ठिकाणी पडलेल्या भेगा रस्त्यालगत असणार्‍या टेकडीमध्ये 50 ते 60 फुटांपर्यंत गेल्याचे निदर्शनास येत आहे. या भेगा आयटीआयपासून काही अंतरापर्यंत वाढल्याचे दिसते.

दरम्यान, बाजिरे धरणाला कोणताही धोका नसून धरणाला तडे गेल्याची व दरवाजे उघडले जाणार असल्याची चर्चा निव्वळ अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सूळ यांनी केले आहे.