ईव्हीएमचा गोंधळ दुसर्‍या टप्प्यातही

राज्यात ५७ टक्के देशात ६6 टक्के,बटण दाबले वंचितला मत गेले कमळाला!,एकूण शांततेत मतदान तिसरा टप्पा २३ला

Mumbai

लोकसभा निवडणुकीत दुसर्‍या टप्प्यासाठी गुरुवारी देशात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६१.१२ टक्के तर राज्यात ५७ टक्के मतदान झाले. देशातील १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात हे मतदान झाले. तर राज्यातील १० मतदान केंद्रावर मतदारांनी, मतदानाचा हक्क बजावला. राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराव अडसूळ, प्रीतम मुंडे या दिग्गजांचे भवितव्यत इव्हीएम मशिनमध्ये बंदिस्त झाले. विशेष म्हणजे इव्हीएम मशिनचा घोळ दुसर्‍या टप्प्यातही दिसून आला. अनेक ठिकाणी इव्हीएम मशिन सुरू होत नसल्यामुळे मतदानाला उशीर झाला. तर काही ठिकाणी इव्हीएम मशिनमध्ये एका पक्षाचे बटन दाबले तर दुसर्‍या पक्षाला मत गेल्याचा आरोपही करण्यात आला.

दुसर्‍या टप्प्यात संपूर्ण देशातील ९७ जागांवर १६२९ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी महाराष्ट्रातील १० लोकसभा मतदार संघात १७९ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले. आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मणिपूर, ओदिशा, पुडूच्चेरी, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६१.१२ टक्के मतदान झाले.

महाराष्ट्रात दुसर्‍या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार होते. २० हजार ७१६ मतदान केंद्रे होती. दुसर्‍या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाडयातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदान झाले.
देशात इथे झाले मतदान

तामिळनाडूतील लोकसभेच्या ३९ जागांपैकी ३६ जागांवर आणि येथील विधानसभेच्या १८ जागांसाठी गुरुवारी पोटनिवडणूक झाली. वेल्लोरची निवडणूक, निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. तसेच ओडिसा विधानसभेच्या ३५ जागांवरही गुरुवारी मतदान झाले. कर्नाटकातील १०, उत्तर प्रदेशातील ८, आसाम, बिहार आणि ओदिशामधील प्रत्येकी ५, छत्तीसगड, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ३, जम्मू-काश्मीरमधील २, मणिपूर आणि पुदुच्चेरीमधील प्रत्येकी १ जागेसाठी गुरुवारी मतदान झाले. ओडिशा विधानसभेच्या ३५ जागांसाठीही आज मतदान झाले.