घरमहाराष्ट्रनिसर्गाच्या संवर्धनासाठी राज्य सरकार राबवणार ‘माझी वसुंधरा’ मोहीम

निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्य सरकार राबवणार ‘माझी वसुंधरा’ मोहीम

Subscribe

पृथ्वी, वायू, जल, अग्नि आणि आकाश या पंचतत्त्वावर आधारित राज्य सरकारकडून उपाययोजन राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेतले आहे.

निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. निसर्गाशी असलेली कटिबद्धतता निश्चित करण्यासाठी, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नि आणि आकाश या पंचतत्त्वावर आधारित राज्य सरकारकडून उपाययोजन राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेतले आहे. हे अभियान राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर ते ३१ मार्चदरम्यान राबवण्यात येणार आहे.

पृथ्वी, वायू, जल, अग्नि आणि आकाश या पंचातत्त्वासोबत जीवन पद्धती अंगिकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही. तसेच जैवविविधतेचेही अस्तित्त्वही राहणार नाही. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पृथ्वी, वायू, जल, अग्नि आणि आकाश या पंचतत्त्वावर आधारित उपाययोजना करून निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्यासाठी राज्यामध्ये ‘माझी वसुंधरा’ हे अभियान हाती घेतले आहे. पृथ्वी तत्त्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे, वायू तत्त्वाचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायूप्रदूषण कमी करून सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता करणे, अग्नि तत्त्वाशी संबंधित ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देणे, आकाश या तत्त्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करून मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती या प्रमुख बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये नागरी ३९५ स्थानिक स्वराज्य संस्था, ३६ शहरे, २२६ नगरपरिषदा, १२६ नगरपंचायती, २७२ ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानाची जबाबदारी पालिका आयुक्त, मुख्याधिकारी, ग्रामसेवक, जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी पृथ्वी ६००, वायू १००, जल ४००, अग्नि १००, आकाश ३०० असे गुण दिले आहेत. त्रयस्त यंत्रणेद्वारे १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान या कामाचे मूल्यमापन करून ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनी विजेत्या संस्थेचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे पर्यावरणीय व वातावरण बदल विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -