महाराष्ट्र कुडकुडणार थंडी वाढणार

येत्या काळात महाराष्ट्र राज्यात थंडी वाढणार असल्याने महाराष्ट्र चांगलाच कुडकुडणार आहे.

the temperature is likely to go below 10 degrees in the state
महाराष्ट्र कुडकुडणार थंडी वाढणार

सध्या महाराष्ट्र राज्यात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. तसेच येत्या काळात महाराष्ट्र राज्यात थंडी वाढणार असल्याने महाराष्ट्र चांगलाच कुडकुडणार आहे. कारण उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्र राज्यातही थंडीचे आगमन झाले आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये १२ ते १५ नोव्हेंबर रोजी हिमवृष्टी होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट वाढणार असल्याने महाराष्ट्रातही आठवडाभरात गारठा वाढून थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात थंडी वाढत असल्याने मुंबई, ठाणे आणि इतर परिसरात गारवा पसरला आहे.

पुण्यात थंडी वाढली

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी थंडीत वाढ दिसून आली आहे. पुण्यात बुधवारी पारा १०.६ अंशापर्यंत खाली आला असून सरासरीपेक्षा ४.७ अंशांनी पारा घसरला आहे. तर राज्यात परभणीत सर्वात कमी ९.९ अंश तापमान नोंदवण्यात आले आहे. तर पुणे थंड शहरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये थंडीची लाट असल्यासारखी स्थिती असल्याचे पुण्यातील हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बुधवारी रात्रीचे तापमान १० ते १२ अंश सेल्सिअस दरम्यान होते. सरासरी तापमानापेक्षा ४ ते ५ अंशानी पारा घसरला आहे. गोंदियामध्ये ११.४ अंश सेल्सिअस असून जळगावमध्ये ११.६ अंश सेल्सिअस आहे. तर चंद्रपूरमध्ये ११.८ अंश सेल्सिअस, औरंगाबादमध्ये १२ अंश सेल्सिअस आणि महाबळेश्वरमध्ये १२.२ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. तसेच राज्यातल्या अनेक भागात तापमानात घट झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.


हेही वाचा – किसान रेलचा शेतकर्‍यांना मोठा आधार