घरमहाराष्ट्रनिसर्गचा कोकणाला सर्वाधिक फटका

निसर्गचा कोकणाला सर्वाधिक फटका

Subscribe

काही लाख घरांचे नुकसान, ६ जणांचे बळी

निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला असून, या वादळामुळे लाखो घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. रायगडमध्ये 1 लाखांहून जास्त झाडे पडली आहेत. श्रीवर्धन आणि मुरुडमध्ये चक्रीवादळ धडकल्याने त्याचा मोठा फटका श्रीवर्धनला आहे. येथील सर्व दळणवळण ठप्प झाले आहे. विजेचे खांब हजारोंच्या संख्येने पडले आहेत. रायगडमध्ये 5 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहेत. अंतर्गत रस्ते खूप खराब झाले आहेत. दूरध्वनी व मोबाईल सेवा खंडीत झाल्याने येथील नागरीक घाबरले आहेत. कोकणात 500 मोबाईल टॉवर पडले आहेत. 10 बोटी अंशत: नुकसान झाले असून 12 हेक्टर मत्स्यशेती खराब झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाने सहाजणांचे बळी घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

चक्री वादळाचा फटका रायगड जिल्ह्याला बसला तसाच तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले असून, 3 हजार झाडे पडली आहेत. 14 सबस्टेशन, 1962 ट्रान्सफॉर्मर विजेचे खांब पडले आहेत, पाणीपुरवठ्याची व्यवस्था काही ठिकाणी विस्कळीत झाली आहे. नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर केले जाणार आहेत. ठाणे जिल्ह्यात 162 कच्च्या घरांची पडझड झाली, झाडांच्या फांद्या पडल्याच्या 360 घटना घडल्या. जिल्ह्यातील सर्व मार्ग व महामार्ग सुरु झाले आहेत उल्हासनगर येथे काही वेळासाठी दूरध्वनी सेवा खंडीत झाली होती.

- Advertisement -

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब हे देखील सहभागी झाले होते. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी देखील सुचना केल्या आहेत.

मृतांच्या वारसांना 4 लाख –
या चक्रीवादळात 6 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 6 जनावरे दगावली तर 16 नागरिक जखमी झाले. रायगड जिल्ह्यात प्राथमिक माहितीनुसार 5033 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले. मयत व्यक्तींच्या वारसांना 4 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -