उदयनराजेंच्या घरातून दीड किलो चांदीची बंदूक चोरणाऱ्या चोराला बंदुकीसहीत अटक

Udayanraje Bhonsale Silver gun
खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांची चांदीची बंदूक

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमधून चांदीची बंदूक चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. मात्र पोलिसांनी शिताफाने या प्रकरणाचा तपास करत चोराला वेळीच अटक केली. त्याच्याकडून चांदीची बंदूक हस्तगत केली आहे. उदयनराजे भोसले हे साताऱ्यासहीत महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्याघरी चोरी झाल्याचे कळताच संबंध सातारा जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र पोलिसांनी वेळीच चोराला अटक केल्यामुळे ही चांदीची बंदूक आता पुन्हा जलमंदिर पॅलेसमध्येच ठेवता येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंदूक चोरी केलेला आरोपी सातारा येथील शनिवार पेठ बाजारपेठेतील एका सोन्या-चांदीच्या दागिन्याच्या दुकानात ही बंदूक विक्रीसाठी आणणार होता. याची माहिती सातारा शहर शाखेचे पोलीस शिपाई गुसिंगे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी दिपक पोपट सुतार याला अटक करण्यात आली आहे. शाहुपुरी पोलीस स्थानकात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही बंदूक अँटिक प्रकारात मोडणारी असून तिचे वजन दीड किलो असून त्याची लांबी दोन फूट असल्याचे सांगितले जात आहे. शाहुपुरी पोलिसांनी गुप्त माहिती मिळाल्यानंतर या चोराला बंदूक विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. अटक झाल्यानंतर चोराने ही बंदूक जलमंदिर पॅलेसमधूनच चोरी केल्याचे मान्य केले. या बंदुकीची किंमत १ लाख ४ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.