…तर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदही सोडलं असतं

मातोश्री प्रेमाने ऐकते दादागिरीने नाही

Mumbai
near by matoshree three police found corona positive in mumbai
मातोश्री

राज्यात बहुमत मिळालेल्या दोन्ही मित्र पक्षांमध्ये सत्तास्थापनेवरून आता मोठा ड्रामा घडताना पाहायला मिळत आहे. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि सत्तेमध्ये समसमान वाटप या आपल्या मागण्यांवर शिवसेना ठाम आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप तयार नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून या दोन्ही मित्रपक्षांमधली युती तुटण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या राज्यात निर्माण झाले आहे. मात्र, ’मातोश्री’ प्रेमाने ऐकते, दादागिरीने नाही. जर भाजपने दादागिरीऐवजी प्रेमाने चर्चा केली असती, तर शिवसेनेने मुख्यमंत्रीपद देखील सोडले असते’, अशी प्रतिक्रिया मातोश्रीच्या निकटवर्तीय शिवसेनेतील एका बड्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या दिवशी वर्षावर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याबाबत ठरलेलेच नाही. ५० -५० चा फॉर्म्युलाही ठरलेला नाही, असे वक्तव्य केले. या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे ’मातोश्री’ दुखावली गेली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर प्रचंड नाराज असून कोणतीही सबब ऐकण्याच्या मन:स्थितीत ते नाहीत. ठाकरे घराण्यालाच खोटे पाडण्याचे काम फडणवीस यांनी केल्याने पक्षप्रमुखच आक्रमक झाले आणि युतीची बोलणी थांबली, असे ही तो नेता म्हणाला.

कोणत्याच पक्षाला स्वबळावर बहुमत नसताना सर्वच पक्ष सत्तेत येण्याच्या समान संधीवर असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यात भाजपच्या जागा १२३ वरून थेट १०५ वर आल्यामुळे भाजपची ताकद राज्यात कमी झाली आहे. त्यांची बार्गेनिंग पावर देखील कमी झाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकांवेळीच ५०-५० चा फॉर्म्युला खुद्द मुख्यमंत्र्यांनीच माध्यमांसमोर बोलताना मान्य केल्यामुळे आणि शिवसेनेला त्याच अटीवर युती करायला लावल्यामुळे आता भाजपची चांगलीच पंचाईत झाली आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणे अशक्य असल्याचे दिसत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र दिवाळीच्या दिवशी ’असा काही फॉर्म्युला ठरलाच नव्हता’, असे म्हणत खुद्द उद्धव ठाकरेंनाच खोटे पाडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुका झाल्यापासून ’आमचं ठरलंय’, असंच सातत्याने म्हणणार्‍या उद्धव ठाकरेंना ऐन वेळी भाजपने फॉर्म्युल्यानुसार वाटाघाटी नाकारल्या.

’मातोश्री’ प्रेमाने ऐकते, दादागिरीने नाही!
मागील ३० वर्षांपासून शिवसेना आणि भाजपाची युती आहे. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत ती तुटली होती. यापूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या काळात देखील राज्यात शिवसेना १७१ जागा आणि भाजप ११७ जागांवर लढून देखील ही नेतेमंडळी शिवसेना प्रमुखांशी मैत्री आणि प्रेमाच्या नात्याने बोलून जादाची मंत्रीपदे आणि जास्त जागाही पदरात पाडून घेत होती. आता मात्र, ’खुद्द मुख्यमंत्री आणि भाजप नेतेमंडळींकडून न जुमानण्याच्या आणि दादागिरीच्या केलेल्या भाषेमुळेच उद्धव ठाकरेंनी ठाम भूमिका घेत मुख्यमंत्रीपदावर अजिबात तडजोड न करण्याची भूमिका घेतल्याचे’ या वरिष्ठ नेत्याने ‘आपलं महानगर’ला सांगितले. ’जर भाजपने आणि फडणवीस यांनी दादागिरी न करता प्रेमाने मातोश्रीची चर्चा केली असती, तर कदाचित शिवसेनेने मुख्यमंत्रीपद देखील सोडलं असतं’, अशी पुस्ती या नेत्याने जोडली.

दरम्यान, शिवसेनेच्या सर्व मुंबई बाहेरील आमदारांना रंगशारदा हॉटेलवर ठेवण्यात आले असून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार देखील मुंबईच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच शरद पवार देखील त्यांचा कोकण दौरा आटोपून मुंबईत रात्री उशीरा दाखल झाले, तर काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांची बैठक शुक्रवारी बोलावली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही बैठक होणार असल्याचे समजते. त्यामुळे, येत्या दोन दिवसांमध्ये सत्तास्थापनेच्या दृष्टीने मुंबईत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळू शकतात. ९ नोव्हेंबर रोजी १३ व्या विधानसभेची मुदत संपत आहे.