चैत्यभूमी झाली भीममय…

लाखो अनुयायांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

mumbai
Public on Chaitya Bhoomi

एकच साहेब…बाबासाहेब, जब तक सूरज चाँद रहेगा, बाबासाहेब तेरा नाम रहेगा, जोर से बोलो जय भीम यांसारख्या घोषणांनी गुरुवारी दादर परिसर दुमदुमला. रात्रीची थंडी व दुपारचे कडक उन्ह या कशाचीही तमा न बाळगता आपली कच्चीबच्चीसोबत घेऊन डोक्यावर गाठोडी बांधून महाराष्ट्रासह देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमीवर उपस्थिती दर्शवली होती. शिवाजी पार्कच्या जवळच असलेल्या चैत्यभूमीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायांनी बुधवारी दुपारपासूनच रांग लावली होती. ती गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. संपूर्ण शिवाजी पार्क परिसर भीममय झाला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवारी रात्रीपासूनच आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर येत होते. दादर रेल्वेस्थानकापासून ते चैत्यभूमीकडे जाणार्‍या रस्त्यांवर सफेद पोशाखातील आंबेडकर अनुयायांनी रस्ते फुलून गेले होते. दादरकडे जाणार्‍या गाड्यांतून मोठ्या प्रमाणात येणारे अनुयायी बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करत होते. त्यामुळे दादर स्थानकाप्रमाणेच मुंबईतील इतर सर्व उपनगरीय रेल्वेस्थानके बाबासाहेबांच्या जयघोषाने दुमदुमली होती. अकोला, वर्धा, परभणी, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबद, सोलापूर, सांगली, पुणे यांसह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात व पंजाब येथून मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. चैत्यभूमीकडे जाणार्‍या रस्त्यांवर सामाजिक संस्था व संघटनांकडून अनुयायांसाठी जेवणाची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाहेर पडणार्‍या अनुयायांसाठी शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात जेवणाची, पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

दादर रेल्वे स्थानकापासून रानडे रोडपर्यंतचा परिसर महापालिकेने फेरीवाला मुक्त केल्याने अनुयायांना चैत्यभूमीकडे जाण्यासाठी दिलासा मिळाला होता. पोलिसांकडून ठिकठिकाणी अनुयायांना चैत्यभूमीकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत होते. परंतु अनेक ठिकाणी पोलिसांनी चुकीचे वाहतुकीचे नियोजन केल्याने त्याचा फटका अनुयायांना बसत होता. चैत्यभूमीकडे जाणार्‍या प्रत्येक सिग्नलवर अनुयायांना मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून थांबवण्यात येत होते. त्यामुळे प्रत्येक सिग्नलवर प्रचंड गर्दी होत होती. त्यातच गाड्यांच्याही रांगा लागत होत्या. मोठ्या प्रमाणात येणारे अनुयायी व वाहने यामुळे पोलिसांची तारांबळ उडत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दोन दिवस अगोदरपासूनच सुरू झालेली रांग गुरुवारी वरळीपर्यंत गेली. त्यामुळे अनुयायांना अभिवादनासाठी तब्बल आठ ते नऊ तास रांगेत उभे राहावे लागत होते. परंतु पोलीस व समता सैनिक दलाकडून गर्दीचे व्यवस्थित नियोजन करण्यात येत असल्याने रांगेत उभे असलेल्या अनुयायांना फारसा त्रास सहन करावा लागत नव्हता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर विश्रांतीसाठी अनुयायी शिवाजी पार्कमध्ये येत होते. शिवाजी पार्कमध्येही उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी अनुयायांमध्ये चढाओढ लागली होती. तसेच शिवाजी पार्कमध्ये उभारलेल्या विविध स्टॉल्सवरही मोठ्या प्रमाणात अनुयायांकडून गर्दी करण्यात येत होती. विशेषत: पुस्तकांच्या स्टॉल्ससमोर अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. त्यानंतर बाबासाहेब, बुद्ध यांच्या मोठ्या प्रतिमा विकत घेण्याकडे अधिक कल दिसून येत होता. लहान मुले लॉकेट, किचेन व टी-शर्ट घेण्यासाठी हट्ट करत होती. आंबेडकरी अनुयायांमुळे शिवाजी पार्कही भीममय झाले होते.

चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर, कालिदास कोळंबकर, प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त जगदीश पाटील, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

व्हीआयपींमुळे अनुयायी ताटकळले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नेते, रिपब्लिकन पक्षासह राज्यातील विविध पक्षांचे नेते, आमदार, खासदार, नगरसेवक, प्रदेशाध्यक्ष, साहित्यिक, डॉक्टर अशा विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती येतात. मात्र महत्त्वाच्या व्यक्तींसोबत 25 ते 30 कार्यकर्ते असतात. त्यामुळे प्रत्येक व्हीआयपी व्यक्तीच्या वेळी सर्वसामान्य अनुयायांची रांग 15 ते 20 मिनिटे थांबवावी लागते. या कार्यकर्त्यांना रोखल्यास त्यांच्याकडून अरेरावी करण्यात येते. त्यामुळे पोलिसही त्यांना रोखत नव्हते. तसेच सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेले पोलीसही त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक यांना व्हीआयपी प्रवेशद्वारातून अभिवादनासाठी घेऊन जात होते. त्यामुळे प्रत्येकवेळी रांग थांबवावी लागत असल्याने देशभरातून आलेल्या सर्वसामान्य अनुयायांना ताटकळावे लागत होते. व्हीआयपींसोबत येणार्‍या कार्यकर्त्यांना आवर घातल्यास सर्वसामान्य नागरिकांना लवकर दर्शन घेता येईल, त्यामुळे व्हीआयपी व्यक्तींसोबत येणार्‍या कार्यकर्त्यांना व पोलिसांच्या नातेवाईकांना रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी समता सैनिक दलाचे अशोक नागटिळक यांनी केली.

‘जय भीम’ टॅटूला तरुणाईची पसंती
दादर स्थानकाकडून चैत्यभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टॅट्टू काढणार्‍यांनी आपले स्टॉल लावले होते. यामध्ये आपले नाव कोरून घेण्याबरोबर ‘जय भीम’, बुद्धांचे चित्र कोरून घेण्याकडे तरुणांचा कल अधिक होता, अशी माहिती टॅट्टू कोरणार्‍या अंजली अराटे या महिलेने सांगितले. टॅट्टू कोरण्यासाठी एका अक्षराला 20 रुपये तर चित्र कोरण्यासाठी 150 ते 200 रुपये शूल्क आकारण्यात येत असल्याचेही अराटे यांनी सांगितले.

केशरचनेत ‘जय भीम’
बदलापूर येथील रहिवासी व मुंबई महापालिकेमध्ये कामाला असलेला भीमराव लक्ष्मण जाधव याने केलेली अनोखी केशरचना सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. भीमरावने त्याने डोक्याच्या बाजूला ‘जय भीम’ व डोक्यावर ‘अशोक चक्र’ कोरले होते. त्याची ही अनोखी केशरचना पाहून रस्त्याने जाणारे प्रत्येक अनुयायी त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीमराव अशी केशरचना आपण सहा वर्षांपासून करत आहे. ही केशरचना करण्यासाठी दोन तास लागले असून, यासाठी 400 रुपये खर्च केल्याचे जाधव म्हणाले.

चित्रिकरणाकडे अनुयायांचा कल
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करत चैत्यभूमीकडे चाललेल्या अनुयायांचा रस्त्यावरील गर्दीचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करण्याकडे कल अधिक होता. गर्दीमध्ये जयघोष करण्यासाठी हात वर येण्याबरोबरच अनेक हातांमध्ये मोबाईल दिसत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here