घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टउदयनराजेंसाठी यंदाची ‘लढाई’ अटीतटीची

उदयनराजेंसाठी यंदाची ‘लढाई’ अटीतटीची

Subscribe

सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमदेवार उदयनराजे यांच्या विरोधात भाजपचे आमदार नरेंद्र पाटील हे शिवसेनेच्या तिकीटावरून निवडणूक लढणार आहेत. सलग दोन लोकसभा निवडणुकीत जिंकून आलेले उदयनराजे यांच्यासाठी २०१९ची लढाई सोपी नाही. कारण उदयनराजे यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्र राजे यांच्याशी वाढलेला संघर्ष आणि भाजपची सातारा जिल्ह्यात वाढलेली राजकीय महत्त्वाकांक्षा हे यामागील प्रमुख कारणे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून अर्थात १९९९ पासून सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या जागांवर आणि लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. १९९९ आणि २००४ च्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचे खासदार लक्ष्मणराव जाधव निवडून आले होते. त्यानंतर मात्र २००९ आणि २०१४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे १३वे वंशज उदयनराजे भोसले हे खासदार म्हणून जिंकून आले. तरुणांना आकर्षित करणारी संवादफेकी, कॉलर उडवण्याची स्टाईल यामुळे उदयनराजे यांनी तरुणांना आकर्षित केले. २०१४च्या मोदी लाटेतही उदयनराजे जिंकून आले. त्यांच्या प्रभावाखाली जिल्ह्यातील विधानसभेच्या जागाही राष्ट्रवादीकडे आल्या. त्यामुळे उदयनराजे यांचे राष्ट्रवादीच्या शिवाय स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण झाले. मात्र राजकारणात जनाधार कायम टिकवून ठेवणे आव्हानाचे असते. याची प्रचिती उदयनराजे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी घेतली आहे. कारण उदयनराजे भोसले यांचे चुलत भाऊ आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्या राजकीय वर्चस्वाला शह देण्यास सुरुवात केली आहे. तरुणांमध्ये शिवेंद्रराजेंचाही बोलबाला वाढत आहे. उदयनराजे भोसले यांच्यासाठी शिवेंद्रराजेंचा उपद्रव त्रासदायक ठरत आहे. या दोन्ही राजपुत्रांमधील शह-काटशहाची लढाई ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत लढाई आहे.

- Advertisement -

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी मोेठी डोकेदुखी बनली, हे सर्वांनी पाहिले. अखेरीस शरद पवारांनी दोन्ही राजांना एकाच गाडीतून सोबत आणून कार्यकर्त्यांमध्ये एकोप्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्याआधी उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. तसे झाले असते, तर राष्ट्रवादीचे हे मोेठे राजकीय नुकसान होते. त्यामुळे शरद पवारांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही राजांमधील वाद शमवले असले तरी भाजपची मात्र या जिल्ह्यात राजकीय महत्त्वाकांक्षा वाढलेली आहे. २०१९साठी सातारा लोकसभा शिवसेनेने मागून घेतली असली, तरी त्याठिकाणी उदयनराजेंना जोरदार टक्कर देणारा उमेदवार सेनेकडे नसल्याने भाजपने याआधीच या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून फोडलेले आमदार नरेंद्र पाटील यांना शिवसेनेकडे सुपुर्द करून त्यांची २०१९च्या लोकसभेसाठी उमेदवारी घोषित करवून घेतली आहे. आमदार नरेंद्र पाटील यांना भाजपने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या अध्यक्षपदी बसवले असून ते मराठा समाजाचे आहे. त्यामुळे सातार्‍यात दोन मराठा नेत्यांमध्ये उघडउघड संघर्ष पेटणार आहे.

दुसरीकडे शरद पवारांच्या मध्यस्थीने जरी दोन्ही राजपुत्रांमध्ये वितुष्ट संपलेले दिसत असले तरी ते वरवरचे आहेे, शिवेंद्रराजे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा यानिमित्ताने उघड झाली आहे. त्यामुळे शिवेंद्रराजे अंतर्गत काय भूमिका घेतील याची अजून शास्वती नाही. नुकत्याच झालेल्या प्रचारसभेत ‘जो मैं बोलता हूँ ओ मैं करता हूँ, जो मैं नही बोलता हूँ ओ डेफिनेटली करता हूँ’, असे सांगून शिवेंद्रराजे यांनी अप्रत्यक्षपणे गर्भीत इशारा दिला आहे. तर त्याच सभेत उदयनराजे यांनी शिवेंद्र आणि मी टॉम अ‍ॅण्ड जेरी आहोत, असे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांचेही उदयनराजे यांच्याशी तितकेसे पटत नाही. याचा परिणाम म्हणून सातार्‍यातून उदयनराजे यांना उमेदवारी देऊच नये, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसमधून निघाला होता. पक्षांतर्गत विरोधामुळे आणि भाजपच्या वाढत्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे यंदाची ‘लढाई’ उदयराजे यांच्यासाठी अटीतटीची बनली आहे.

- Advertisement -

सातारा लोकसभा मतदार संघाचा इतिहास
सातारा लोकसभा मतदार संघात १९५१ पासून १९९१ पर्यंत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते, फक्त १९५७ मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, १९९६ मध्ये शिवसेनेने ही जागा जिंकली होती. त्यानंतर मात्र शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून अर्थात १९९९ पासून २०१४ पर्यंत जिल्ह्यात सलग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. यात १९९९ आणि २००४ मध्ये राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव जाधव हे निवडून आले. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्ये उदयनराजे भोसले हे विजयी झाले. या मतदारसंघात ६ विधानसभा मतदार संघ येतात. ज्यामध्येही ४ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकल्या असून एक काँग्रेस आणि १ शिवसेनेने जिंकली आहे. विशेष म्हणजे २०१४ मध्ये देशभर मोदी लाट असताना राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा राज्यात भाजपला एकही विधानसभेची जागा जिंकू दिली नाही, तसेच लोकसभेमध्ये उदयनराजे सातार्‍यातून ३ लाख ६६ हजार ५९४ मताधिक्क्याने निवडून आले होते, त्यांना ५ लाख २२ हजार ५३१ मते मिळाली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २०१९च्या लोकसभेसाठीही पुन्हा उदयनराजे यांनाच उमेदवारी दिली आहे.

सातारा मतदार संघ
एकूण मतदार – १८ लाख २३ हजार ४७६
एकूण विधानसभा – ६ (वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, फलटण, सातारा)

जिल्ह्यातील प्रभावी नेते
राष्ट्रवादी काँग्रेस – उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, रामराजे निंबाळकर
भाजप – नरेंद्र पाटील

मतदार संघातील प्रभावी विषय
मराठा आरक्षण – मराठा आरक्षणासाठी राज्यभर मोठे आंदोलन उभे राहिले, ज्यामध्ये सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाचा विशेष सहभाग होता, या ठिकाणी मराठा समाजाची लोकसंख्या अधिक आहे. अखेरीस सरकारने १६ टक्के आरक्षण दिले, मात्र ते न्यायालयाच्या कचाट्यात सापडले.
ऊसदर – सातारा ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. या ठिकाणच्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांना योग्य भाव मिळणे, अशी अपेक्षा आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -