पैसे दे अन्यथा अंगावर थुंकून करोना बाधित करेन

करोनाची भिती दाखवत खंडणी मागणार्‍यास कोठडी

Corona : came to the village and was caught by the police

मला करोना झाला असून, पैसे दे, अन्यथा अंगावर थुंकून बाधित करेने, अशी धमकी देत एकाने खंडणी मागितल्याची घटना सोमवारी (दि.१) द्वारका येथील बेला पेट्रोलपंपावर घडली. या प्रकरणी तुफैस अहमद शबीर शेख (४५, रा.जोगावाडा, भद्रकाली) यांच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला अटक केली.
दीपक सोपान नाडे (३२, रा. नागसेननगर, वडाळा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तुफैस शेख हे बेला पेट्रोलपंपावर कर्मचारी म्हणून काम करतात. सोमवारी (दि.१) ते पेट्रोलपंपावर असताना संशयित नाडे त्यांच्याजवळ आला. मी मालेगावी जावून आलो आहे. मला करोना झाला आहे. तू मला २ हजार रूपये दे नाहीतर तुझ्या अंगावर थुंकून तुला करोना आजार लावेन. पैसे न दिल्यास हातपाय तोडून टाकेन, अशी धमकी नाडे याने शेख यांना दिली. याप्रकरणी शेख यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात नाडेविरुद्ध तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी नाडे यास मंगळवारी अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ गेंगजे करत आहेत.