शरद पवार, अनिल देशमुख यांनाही आता धमक्यांचे फोन

शरद पवार, अनिल देशमुख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले आहेत. शरद पवार यांना भारताबाहेरुन हा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी हा फोन आला होता. गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान, ही धमकी जीवे मारण्याची आहे की खंडणीसाठी याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही धमकीचे फोन आले होते, मात्र हे फोन कोणी केले याबद्दल अद्याप काहीच कळलेले नाही. तसेच कोणालाही अटक करण्यात आलेले नाही.

रविवारी मातोश्री निवासस्थानी निनावी फोन आला होता. तसाच फोन रविवारी शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आला. दोघांच्याही घरातील लँडलाइन फोनवर विदेशातून अज्ञात व्यक्तीने कॉल केले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे.

रविवारी एका व्यक्तीने सकाळी ११च्या सुमारास मातोश्री निवासस्थानी फोन कॉल करून धमकी दिली होती. दाऊद गँगकडून बोलत असल्याचा या व्यक्तीचा दावा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देतानाच मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याचा इशाराही या व्यक्तीने दिला होता.

आपल्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचेही ही व्यक्ती म्हणाल्याचे सांगितले जात आहे. या फोनमुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत मातोश्री निवासस्थानाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. या प्रकारावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गंभीर चर्चाही झाली. तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाने अशी धमकी देणार्‍या प्रवृत्तीचा निषेध केला. याच बैठकीत या प्रकरणी गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू करण्यात आल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी नमूद केले होते. या कॉलनंतर आज देशमुख आणि शरद पवार यांच्या निवासस्थानीही धमकीचे फोन खणखणल्याने चिंता आणखी वाढली आहे.

राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या घरी धमकीचे फोन करणारी व्यक्ती कोण आहे? खरंच दाऊद गँगशी या व्यक्तीची लिंक आहे का? की यामागे आणखी कुणाचा हात आहे, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होऊ शकणार आहे. तूर्त धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आवश्यक असलेली सर्व खबरदारी घेतली जात आहे. मातोश्री निवासस्थानासोबतच पवार यांचं सिल्व्हर ओक निवासस्थान तसेच अनिल देशमुख यांच्या निवासस्थानालाही अधिक सुरक्षा पुरवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाने कालच हे आंतरराष्ट्रीय कॉल असल्याने केंद्र सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

धमकीच्या फोनबाबत नीट चौकशी झाली पाहिजे. हे फोन खरे आहेत की कुणी जाणीवपूर्वक करत आहे, या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. ज्यांना धमकीचे फोन आले आहेत, त्यांची प्रशासनाने विशेषत: पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा