घरमहाराष्ट्रमाणगावमधील सिलिंडर स्फोटातील 3 जखमींचा मृत्यू

माणगावमधील सिलिंडर स्फोटातील 3 जखमींचा मृत्यू

Subscribe

कंपनी बोगस असल्याचा आरोप

तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक वसाहतीमधील क्रिप्टझो इंजिनिअरिंग कंपनीत शुक्रवारी झालेल्या सिलिंडर स्फोटात गंभीर जखमी झालेल्या ३ कर्मचार्‍यांचा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण असून, ही कंपनी बोगस असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता ही भीषण दुर्घटना घडली. यात १८ कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी ५ जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. यातील आशिष येरूणकर (रा. म्हसेवाडी, ता. माणगाव), राकेश हळदे (रा. उंबर्डी, ता. माणगाव) आणि कैलास पाडावे (रा. शिरवली, ता. माणगाव) यांचा शनिवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

- Advertisement -

त्यानंतर संतापलेल्या निजामपूर, विळे भागाड परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत कंपनी संचालक आणि सरकारी अधिकार्‍यांची वाट पाहत कंपनीसमोर ठिय्या मारला. तसेच मृतदेह ताब्यात न घेण्याचा आक्रमक पवित्रा घेतला.

काही वेळानंतर उप विभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे, पंचायत समितीचे सभापती सुजित शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद, पोलीस निरीक्षक रामदास इंगवले तेथे आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. ही कंपनी २०१५ पासून बेकायदेशीररित्या चालू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या कंपनीला फेब्रुवारी २०१९ मध्ये रितसर मशिन मेकिंग शॉपचे लायसन्स देण्यात आले होते, मात्र चाचणीची परवानगी देण्यात आली नव्हती. ही कंपनी बोगस असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना, तसेच जखमींना कंपनी व्यवस्थापन जोपर्यंत नुकसान भरपाई देण्याचे लेखी स्वरुपात कबूल करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिघावकर यांनी दिले.

- Advertisement -

यावेळी औद्योगिक सुरक्षा विभागाचे उप संचालक अंकुश खराडे आणि कारखाना निरीक्षक केशव केंद्रे उपस्थित होते. कंपनीला मशिन मेकिंग शॉपचे लायसन्स देण्यात आले होते आणि चाचणीसाठी परवानगी देण्यात आली नसल्याचे त्यांनी मान्य केले. कंपनीच्या मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र संतापलेल्या ग्रामस्थांनी मालकाप्रमाणे कारखाना निरीक्षकाविरोधातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या वारसांना, तसेच जखमींना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -