घरमहाराष्ट्रनीरव मोदीचा बंगला पाडण्यास सुरुवात

नीरव मोदीचा बंगला पाडण्यास सुरुवात

Subscribe

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून देश सोडून परदेशात फरार झालेला डायमंड किंग नीरव मोदी याचा अलिबाग तालुक्यातील किहीम येथील अनधिकृत बंगल्यावर शुक्रवारी अखेर हातोडा पडला. बंगला पाडण्याची कारवाई किमान 8 दिवस चालणार आहे.

सक्तवसुली संचालनालयाने नीरव मोदीचा बंगला रायगड जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिल्यामुळे हा बंगला पाडण्याच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू करण्यात आली.

- Advertisement -

अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्रकिनारी 70 गुंठे जागेत जवळपास 30 हजार चौरस फुटांच्या क्षेत्रावर निरव मोदी याने बंगल्याचे बांधकाम केले आहे. नीरव मोदी फरार घोषित झाल्यानंतर ही मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली होती. ही मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात असल्याने ती पाडण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाची मान्यता हवी होती. याबाबत ईडीने निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने सुचवले होते. सक्तवसुली संचालनालयाने दोन दिवसांपूर्वीच या बंगल्यातील सामान हलवले असून २४ जानेवारी रोजी बंगला रायगड जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरीत केला.

त्यानंतर रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी बंगला पाडण्याबाबत हालचाली सुरू केल्या. शुक्रवारी सकाळपासूनच महसूल विभागाचे, बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस यांची धावपळ सुरू झाली. अखेर सायंकाळी 4 वाजता स्वतः जिल्हाधिकारी सूर्यवंशी दाखल झाले आणि जेसीबीच्या सहाय्याने बंगल्यावर कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे हेदेखील उपस्थित होते.

- Advertisement -

बंगल्याचे बांधकाम मजबूत काँक्रीटचे असून मोठे आहे. बांधकाम पूर्णपणे पाडण्यास किमान 8 ते 10 दिवस लागतील .– डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी रायगड

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -