शेतकऱ्यांच्या मदतनिधीसाठी पंतप्रधानांची भेट घेणार; शरद पवार यांची उस्मानाबाद दौऱ्यावर माहिती

राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारपुढे मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहीजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. यासंबंधी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे आज, रविवारी शरद पवार यांनी त्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान म्हटल आहे. शरद पवार आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असून उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांसह शेतातील मातीही वाहून गेली आहे. हे संकट मोठे आहे. सरकारची सर्व ताकद शेतकऱ्यांच्या पाठीशी लावू, असे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिले. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास राज्य सरकारला मर्यादा असून यासाठी राज्यातील खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, केंद्राकडे मदतीची मागणी करणार असल्याचेही पवार यावेळी म्हणाले. येत्या १० दिवसात आपण दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

काय म्हणाले शरद पवार 

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान मोठे आहे. या संकटावर एकत्रितरित्या मात करायला हवी. आपण भूकंपासारख्या संकटाला तोंड दिले आहे, त्यामुळं धीर धरा. शेतकऱ्यांना काय देता येईल हे आज लगेच सांगता येणार नाही. पण पिकांचे झालेले नुकसान, दगावलेली जनावरं आणि घरांची झालेली पडझड यासाठी सरकार नक्की मदत करेल, असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.

हेही वाचा –

Photo : कंगनाने दिले राज्य सरकारला उत्तर; म्हणाली, ‘मी लवकरच परत येईन’