घरमहाराष्ट्रआज धाकुमाकूम...धाकुमाकूम...

आज धाकुमाकूम…धाकुमाकूम…

Subscribe

नजर जय जवान, माझगाव ताडवाडी आणि शिवशाहीवर ,सुरक्षिततेच्या नियमांना बगल दिल्यास होणार कारवाई

‘अरे, बोल बजरंग बली की… जय’ अशा जयघोषात शनिवारी मुंबईतील गोविंदा पथक पुन्हा एकदा थरांच्या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. शनिवारी गोपाळ कालानिमित्त मुंबईत विशेष करून ठाण्यात पुरुष आणि महिला गोविंदा पथक मानवी मनोरे रचण्यासाठी आगेकूच करणार आहेत. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही या स्पर्धेला सुरक्षित नियमांची चौकट ठरवून देण्यात आली आहे. तरीही गोविंदा पथकांमध्ये उत्साह ओसांडून वाहत आहे. यात नामांकित अशा जय जवान, माझगाव ताडवाडी, शिवशाही सारख्या गोविंदा पथकांचा समावेश आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील ही मंडळे किती थरांचा विक्रम करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईसह ठाण्यातील गोविंदा पथकांनी गेल्या महिन्याभरापासून थरांच्या स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व गोविंदा पथकांना आणि आयोजकांसाठी काही नियम आणि अटी यंदा ही कायम ठेवण्यात आल्या आहेत. ते नियम आणि अटी पाळून गेल्या महिन्याभर सराव पूर्ण केल्यानंतर अनेक गोविंदा पथकांनी चोर गोविंदादरम्यान आपली चमक दाखवली. त्यांनतर आता शनिवारी गोपाळ काल्यानिमित्त गोविंद पथकांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. मुंबईतील सर्वच गोविंदा पथकांनी त्यानुसार तयारी पूर्ण केली आहे. यासाठी शनिवारी सकाळी जागेवाल्याची पूजा केल्यानंतर गोविंदा पथकांचा प्रवास सुरु होणार आहे. मुंबईत प्रामुख्याने दादर, लालबाग, परळ याबरोबरच काळाचौकीत एकलव्य प्रतिष्ठान आयोजित केलेल्या विभागात गोविंदा पथक हजेरी लावणार आहेत. तर ठाण्यात मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडी प्रमाणेच संकल्प प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या प्रो. गोविंदासाठी गोविंदा पथक भाग घेणार आहेत. त्याच बरोबर नवी मुंबईत ही अनेक आयोजकांनी मानाच्या दहीहंडीचे आयोजन केले असून मुंबईतील गोविंदा पथक त्याठिकाणी हजेरी लावणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबईकरांचे लक्ष हे प्रामुख्याने नऊ थर लावणार्‍या पथकांवर असणार आहे. माझगाव येथील ताडवाडी गोविंदा पथक, जोगेश्वरी येथील जय जवान गोविंद पथक, बोरीवली येथील शिवशाही गोविंदा पथक, संलग्न बाळ गोपाळ, सुभाष लेन गोविंदा पथक यासारखी अनेक पथके यंदा पुन्हा थरांचा विक्रम करणार का याबाबत सर्वांना उत्सुत्कता लागून राहिली आहे. गोविंदा पथके नियमांचे पालन करताहेत की नाही हे पाहण्यासाठी पोलिसांच्या नजरा देखील या गोविंदा पथकांवर असणार आहेत. तर अनेक गोविंदा पथकांनी पूरग्रस्तांसाठी अगोदरच मदत जाहीर केली असली तरी अनेक मंडळे शनिवारी मदत जाहीर करणार असल्याची माहिती मंडळांकडून देण्यात आली आहे.

काय आहेत नियम
१. १४ वर्ष खालील कोणत्याही गोविंदाला थरामध्ये सहभागी करता येणार नाही.
२. सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून चेस्ट गार्ड, हेल्मेट, हार्नेस, मॅट यासारख्या सर्व गोष्टींचा वापर करणे बंधनकारक आहे.
३. गोविंदा पथकातील सर्व गोविदांचा विमा असणे बंधनकारक आहे.
४. प्रवास करताना कुठे ही ट्रिपल सीट, बस किंवा ट्रकच्या टपावरून प्रवास करू नये.
५. पोलिसांना संपूर्ण सहकार्य करावे.
६. आयोजकांनी देखील सुरक्षित आयोजनाची सर्वस्वी काळजी घेणे.
७. गोविंदा पथकांसोबत आयोजकांनी देखील विमा काढणे बंधनकारक आहे.

- Advertisement -

तयारी निवडणुकीची

मुंबईचा ठाण्यात शनिवारी गोपाळ काला मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून यात अनेक राजकीय नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपला प्रचाराचा नारळ फोडण्याची तयारी केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता अनेक इच्छुकांनी आपल्या ठिकाणी दहीहंडीचे आयोजन केले आहे. तर अनेक इच्छुकांनी आपल्या मतदार संघातील गोविंदा पथकांच्या बनियानवर प्रचाराचा फंडा अवलंबला आहे. त्यात भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे नेते आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी ईव्हीएमला केलेला विरोध याचे पडसाद देखील या गोपाळ काल्यात उमटणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -