घरमहाराष्ट्रआज मंत्रिमंडळाचा विस्तार

आज मंत्रिमंडळाचा विस्तार

Subscribe

कुणाला मिळणार डच्चू?

विद्यमान मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना हटविले जाणार असून त्यात घोटाळ्याचा आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय काही मंत्र्यांच्या कामकाजावर मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे वरिष्ठ नेते नाराज आहेत. त्यामुळे त्यांनाही डच्चू मिळू शकतो. याशिवाय आणखी काही मंत्री आणि त्यांच्या खात्यांवरही घोटाळे आणि भ्रष्टाचाराचा आरोप असून त्यांनाही या विस्तारातून वगळले जाणार आहे. मंत्रिमंडळातून नारळ देण्यार्‍यांमध्ये राजकुमार बडोले, विष्णू सवरा, बबनराव लोणीकर, अंबरिशराजे आत्राम, प्रवीण पोटे या भाजपच्या मंत्र्यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आह

गेल्या अनेक दिवसांपासून उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. रविवारी सकाळी ११ वाजता राजभवनात या नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिल्लीत या विस्ताराची अधिकृत घोषणा केली. या विस्तारात मंत्रीपदी नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. यात प्रामुख्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची विशेष चर्चा आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान, शनिवारी मंत्रालयात या शपथविधीची तयारी सुरू झाली असून अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सर्वसामान्य जनतेलाही या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता आहे. नव्याने होणार्‍या मंत्र्यांना पुढील शंभर दिवस काम करण्याची संधी मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गेल्या अनेक दिवसांपासून बरेच इच्छुक वाट पाहत आहेत. हमारा नंबर कब आयेगा, यासाठी महायुतीचे अनेक नेते देव पाण्यात ठेऊन बसले होते. अखेर हा दिवस आला असून आपली मंत्रीपदावर वर्णी लागावी म्हणून गेल्या दोन दिवसांपासून जोरदार लॉबिंग सुरू आहे. राज्यात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विस्तार होत असून त्यात नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अलिकडेच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील यांचीही मंत्रीपदी वर्णी लागू शकते, असे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून समजतेे. याशिवाय आशिष शेलार, औरंगाबादचे आमदार अतुल सावे, राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, जयदत्त क्षीरसागर, संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे,परिणय फुके, सुरेश यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजपा सकारात्मक असून त्याबद्दलचे चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे. एका मंत्रीपदावर रिपाइंतर्फे (आठवले गट) दावा करण्यात आला आहे. अविनाश महातेकर यांचे नाव केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविल्याचे समजते.

सोमवारपासून पावसाळी अधिवेशन
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून १७ जून ते २ जुलै या कालावधीत ते चालणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असून त्यानंतर काही दिवसांतच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता असल्याने राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प पावसाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे. मंगळवारी १८ जून रोजी सकाळच्या सत्रात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प पटलावर मांडला जाईल. बुधवारी आणि गुरूवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होऊन, गुरूवारी विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडला जाईल. शुक्रवारी अशासकीय कामकाज अर्थातच ठराव मांडले जाऊन शनिवार व रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी २४ आणि मंगळवारी २५ जून रोजी अर्थसंकल्पावर अनुक्रमे चर्चा व मतदान होईल. बुधवारीही अर्थसंकल्पावर चर्चा होऊन शुक्रवारी आणि शनिवारी पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -