दिग्गज नेत्यांची होम पिचवरच दमछाक; इतर ठिकाणी प्रचाराला वेळच नाही

लोकसभा निवडणुकीकडे पाहिले तर राज्यातील दिग्गज नेत्यांची त्यांच्या होम पिचवरच दमछाक होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे दिग्गज नेते राज्यभर प्रचार सभा घेत होते ते यावेळी मात्र स्वत:च्याच होमपिचवर अडकून राहिले आहेत.

Mumbai
top leaders in maharashtra got busy in local election campaign
दिग्गज नेत्यांची होम पिचवरच दमछाक

सध्या देशासह राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असून, जाहीरसभांना देखील जोर आला आहे. मात्र २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीकडे पाहिले तर राज्यातील दिग्गज नेत्यांची त्यांच्या होम पिचवरच दमछाक होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे दिग्गज नेते राज्यभर प्रचार सभा घेत होते ते यावेळी मात्र स्वत:च्याच होमपिचवर अडकून राहिलेत कि काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

या नेत्यांना इतर ठिकाणी प्रचाराला वेळच नाही

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचारसभांचा धुरळा पहायला मिळाला होता. मात्र अजित दादा या निवडणुकीत त्यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या मावळ याठिकाणी अडकल्याचे पहायला मिळत आहेत. त्यांचे लक्ष आता इतर महाराष्ट्रातील मतदारसंघापेक्षा मावळकडे जास्त आहे. पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदारसंघामध्ये छोट्या मोठ्या सभा इथपर्यंत अजित पवार लक्ष देत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे उभे असलेल्या बारामतीमध्ये देखील दादांना ताईंसाठी वेळ नसल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांची देखील हीच अवस्था आहे. सुप्रिया सुळे यांच्या समोर भाजपाने कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याने त्यातच भाजपाचे सर्व मंत्री बारामतीमध्ये तळ ठोकून बसल्याने कोणताही धोका पत्कारायचा नाही म्हणून सुप्रिया सुळे या देखील राज्यातील इतर मतदासंघापेक्षा स्वत:च्या बारामती मतदारसंघात जातीने लक्ष घालत आहेत.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची देखील हीच अवस्था झाली आहे. नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवू, अशी घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून पूत्र निलेश राणे आणि औंरगाबादमधून सुभाष पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र पक्षाचे अध्यक्ष असलेल्या राणेंना स्वत:च्या मुलासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तळ ठोकून बसावे लागले आहे. २०१४ ला लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पराभूत केल्यामुळे यावेळी नारायण राणेंनी स्वत: या मतदारसंघात जातीने लक्ष घातले आहे. त्यामुळे औरंगाबादच्या जागेपेक्षा राणेंचा फोकस मुलाची जागा निवडून आणण्याकडे असल्याचा दिसून येत आहे. तर दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची देखील हीच अवस्था झाल्याचे पहायला मिळाले, पहिल्या टप्पातील मतदान संपेपर्यंत नितीन गडकरी यांनी स्वत: च्या मतदारसंघात राहणे पसंत केले. नाना पटोले यांचे तगडे आव्हान पाहता गडकरींनी इतर ठिकाणी जाणेच टाळले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील अस्वस्थ

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तर मला चक्रव्यूहात अडवले जात असल्याची खंत देखील नांदेड येथील जाहीर सभेत बोलून दाखवली. भाजपाने त्यांच्या विरोधात प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी दिल्याने तसेच भाजपाने आपली सगळी ताकद या मतदारसंघात उतरवल्याने प्रदेशाध्यक्ष असूनही त्यांना आता स्वत:च्या होमपिचवरच बॅटींग करावी लागत आहे. नांदेडमध्ये स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी अशोक चव्हाण गेले काही दिवस नांदेडमध्ये तळ ठोकून बसले असून, राज्यातल्या इतर मतदारसंघात देखील त्यांना त्यामुळे जाता येत नाही.

दिग्गजांसमोरच्या लढती

नांदेड – अशोक चव्हाण विरूद्ध प्रतापराव चिखलीकर
बारामती – सुप्रिया सुळे विरूद्ध कांचन कुल
रत्नागिरी – निलेश राणे विरूद्ध विनायक राऊत
मावळ – पार्थ पवार विरूद्ध श्रीरंग बारणे
नागपूर – नितीन गडकरी विरूद्ध नाना पटोले


हेही वाचा – मी एनडीएसोबतच राहणार – नारायण राणे

हेही वाचा – काँग्रेसची विचारधारा आणि राज ठाकरेंची विचारधारा वेगवेगळी – नितीन गडकरी


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here