टीआरपीप्रकरणी मुंबई पोलिसांची सहा पथके विविध राज्यात रवाना

बनावट टीआरपी आणि त्याद्वारे जाहिरात देणार्‍या उद्योगांचा शोध घेणार

वाहिन्यांच्या बनावट टीआरपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागातील अधिकार्‍यांची सहा पथके निर्माण केली असून, ही पथके बनावट टीआरपी आणि त्याद्वारे जाहिरात देणार्‍या उद्योगांचा शोध घेणार आहेत. टीआरपी नसताना किती रकमांची फसवणूक वाहिन्यांनी केली याचाही शोध या पथकाकडून घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

टीआरपीत फेरफार करून जाहिरातदारांची फसवणूक करणार्‍या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आल्यानंतर खोट्या टीआरपीच्या चौकशीची जबाबदारी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिली. ही जबाबदारी येताच आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख, उपायुक्त पराग मणेर यांनी विभागातील अधिकार्‍यांची सहा पथके तयार केली आहेत. हे प्रकरण आर्थिक गुन्ह्याशी संबंधित असल्याने त्यांची कसून चौकशीच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानुसार विभागाने. तात्काळ निर्णय घेत पथकांची निर्मितीही करून घेतली.

यातील एक पथक दमण येथे रवाना झाले असून, ते घनशाम सिंग यांची जबानी नोंदवणार आहे. टीआरपीमध्ये फेरफार केल्याचा आरोप असलेल्या रिपब्लिक वाहिनीच्या चौघांना काल समन्स बजावण्यात आले आहेत. याशिवाय हंस कंपनीच्या दोघांनाही चौकशीला बोलावण्यात आले आहे. आज सकाळी रिपब्लिक वाहिनीचे मुख्याधिकारी विकास खानचांदानी यांनी अन्वेषण कार्यालयात हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. याच वाहिनीचे वितरण प्रमुख असलेले घनश्याम सिंग यांनाही चौकशीला बोलावण्यात आले होते; पण ते दमणला असल्याचे कळताच एक पथक दमण येथे रवाना करण्यात आले आहे. या वाहिनीचे हर्ष भंडारी, प्रिया मुखर्जी यांनाही समन्स बजावण्यात आले आहे.

टीआरपी प्रकरणातील आणखी संशयित विविध ठिकाणी असल्याचे कळताच अन्वेषण विभागाने सहा पथके तयार केली आहेत. या संशयितांच्या शोधार्थ ही पथके काही राज्यांमध्ये रवाना करण्यात आली आहेत. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.