मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Kudal
two person death in accident at Mumbai-Goa highway
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर मालवाहू ट्रक आणि बुलेरो गाडी यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी म्हणजे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गाच्या बिबवणे आणि तेर्सेबांबर्डे गावांच्या सीमेवर असलेल्या गुरुप्रसाद हॉटेल समोर ही दुर्घटना घडली. या अपघातात बुलेरो गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच क्षणी घटनास्थळी कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने बोलेरो गाडी बाजूला करण्यात आली असून मृतांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी निर्माण झाली होती.

उभ्या ट्रकला भरधाव बुलेरोची धडक

तेर्सेबाबंर्डे येथे सकाळी एक ट्रक पंक्चर झाल्यामुळे उभा होता. या ट्रकचा नंबर केए २२-९९२५ असा होता. या ट्रकमध्ये स्टीलचे सामान होते. हा ट्रक कोल्हापूर पासून गोव्याच्या दिशेला स्टीलची वाहतूक करत होता. दरम्यान, गाडीचे चाक पंक्चर झाल्यामुळे तेर्सेबाबंर्डे येथे हा ट्रक रस्त्यावर उभा करण्यात आला. मात्र, रत्नागिरीकडून गोव्याच्या दिशेला भरधाव वेगात जाणाऱ्या एका बुलेरोने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात कॅबिनमध्ये असणारा कालचालकाचा आणि त्याच्यासोबत असणाऱ्या एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय बुलेरो गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.


हेही वाचा – अनंतनागमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान