घरCORONA UPDATECoronavirus: युरोपमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना उदय सामंत यांचा मदतीचा हात

Coronavirus: युरोपमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना उदय सामंत यांचा मदतीचा हात

Subscribe

कोरोना विषाणूने सध्या जगभरात थैमान घातले असून अनेक देश लॉकडाऊन झाले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व देशांनी आपल्या सर्व यंत्रणा कामाला लावल्या आहेत. पण, या लॉकडाऊनमुळे सध्या अनेक नागरिक हे आपल्या देशाशिवाय इतर देशांमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये भारतीय नागरिक आणि विद्यार्थी यांची संख्या देखील लक्षणीय अशीच आहे. परदेशात असलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तसेच नेते आणि मंत्री यांच्याकडून देखील प्रयत्न होताना दिसत आहेत. तसाच काहीसा अनुभव हा युरोपमधील लॅटिव्हिया या देशात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना आला आहे.

या ठिकाणी ३८ विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ८ विद्यार्थी हे महाराष्ट्रातील आहेत. लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांकडील जीवनावश्यक वस्तूंचा साठा देखील संपला. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर उदय सामंत यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधत सारी परिस्थिती सांगितली. यानंतर या विद्यार्थ्यांना आठ दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी एक व्हिडीओ तयार करत उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

लॅटिव्हिया या देशात अडकलेल्या राज्यातील ८ विद्यार्थ्यांसह उर्वरित ३० विद्यार्थ्यांना देखील भारतात सुखरूप आणवे, यासाठी उदय सामंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे भारत सरकार या साऱ्या स्थितीबाबत काय निर्णय घेणार? हे पाहावं लागणार आहे.

यापूर्वी सिंगापूरच्या विद्यार्थ्याने देखील केलेली मदत

परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना उदय सामंत यांनी केलेली मदत ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील सिंगापूर येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी उदय सामंत यांच्याशी संवाद साधत सारी परिस्थिती कथन केली होती. त्यावेळी देखील सामंत यांनी या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याकरता तातडीनं पावलं उचलली होती. दरम्यान, त्यावेळी देखील या विद्यार्थ्यांनी उदय सामंत यांचे आभार मानले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -