उदयनराजे पुन्हा मराठा आरक्षणाच्या बैठकीला गैरहजर; संभाजीराजेंची उपस्थिती

udayan raje again absent in maratha reservation meeting, sambhaji raje attend the meeting
उदयनराजे पुन्हा मराठा आरक्षणाच्या बैठकीला गैरहजर

मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी नवी मुंबईत आज मराठा आरक्षण बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थिती लावली. मात्र, भाजपचे दुसरे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या बैठकीला दांडी मारली आहे.

मराठा नेत्यांमध्ये एकवाक्यता यावी यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. नरेंद्र पाटील यांनी दोन्ही राजे या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दोन्ही राजेंनी जर एकत्र निर्णय घेतला तर तो निर्णय मराठा समाजासाठी शेवटचा असतो. त्यामुळे मराठा आरक्षणच्या मुद्द्याला गती मिळेल असा दावा पाटील यांनी केला होता. मात्र, या बैठकीला उदयनराजे यांनी पाठ फिरवली. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

माझी खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको- संभाजीराजे

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी बैठकीला व्यासपीठावर ठेवलेल्या खुर्चीवर न बसता समन्वयकांसह खालीच बसणे पसंत केलं. आपण राजे घराण्याच्या सन्मान राखलात, आमच्यासाठी दोन मोठ्या खुर्च्या ठेवल्या. पण मी त्यावर बसणार नाही. मी माझ्या समाजसोबतच खाली बसणार, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. यानंतर संभाजीराजे यांनी आयोजकांना आपल्याला अशाप्रकारे वेगळी वागणूक देऊ नये, अशी विनंतीही केली. मी इथे येतोय म्हणजे मी समाजाचा घटक म्हणून येतो. ज्यावेळी मानपान घ्यायचा असतो तेव्हा पुढाऱ्यांकडून आम्ही तो बरोबर घेतो. माझी सुद्धा खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको, असं संभाजीराजे यांनी म्हटलं.