घरमहाराष्ट्र'मुख्यमंत्री कोण हे आम्ही बघू, तुम्ही कामाला लागा', सेना-भाजपच्या आमदारांना सूचना

‘मुख्यमंत्री कोण हे आम्ही बघू, तुम्ही कामाला लागा’, सेना-भाजपच्या आमदारांना सूचना

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना आणि भाजप आमदारांची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा न करता निवडणुकांच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री पदावरून शिवसेना- भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर आता याची दखल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. आता ‘यावर कुणीच काही प्रतिक्रिया देऊ नका’, असा दम दोन्ही पक्षाच्या आमदारांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विधान भवनात आज युतीच्या सर्व आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी या नेत्यांना धारेवर धरले. या बैठकीत नव नियुक्त उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे अभिनंदन देखील करण्यात आले.

उद्धव म्हणाले ‘आपलं ठरलंय’!

‘सध्या आपली युती झाली हे काही लोकांना बघवत नाही. त्यामुळे तुम्ही काहीही बोलला तरी त्याचे उलट अर्थ काढले जातील. मुख्यमंत्री कुणाचा होणार? या बाबत आम्ही बघून घेऊ, तुम्ही युतीची सत्ता आणण्यासाठी काम करा’, असा सज्जड दमच उद्धव ठाकरेंनी भरल्याची माहिती मिळत आहे. नुकतेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘
लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. त्यामुळे सर्वांच्या भावना आहेत की, भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा’, असे वक्तव्य केले होते. तसेच ‘लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी शिवसेना कमजोर होती ती जागा निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. आम्ही आता २८८ जागांवर बूथ बांधणी करत आहोत. पक्ष मजबूत करतोय. त्या बळावरच निवडणुका जिंकत आहोत’, असे सांगितल्यानंतर शिवसेना नाराज झाली होती. त्यामुळेही दोन्ही पक्षांची ही नाराजी आणखी वाढू नये म्हणून आज दोन्ही पक्षाच्या आमदारांची बैठक विधान भवनात बोलावण्यात आली होती.

- Advertisement -

गिरीश महाजन यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

दरम्यान, गिरीश महाजन यांनी केलेल्या व्यक्तव्यामुळे दोन दिवस युतीचे वातावरण बिघडले होते. त्यामुळे बैठक संपल्यानंतर गिरीश महाजन यांनी ‘शिवालय’ येथे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र, नेमकी भेट का घेतली? हे गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

महायुतीबाबत जे काही बोलायचे आहे, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बोलतील. तसेच युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री कोण? याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे घेतील. आमच्यात कोण लहान-कोण मोठा भाऊ नसून आम्ही दोघेही भाऊ भाऊ आहोत.

सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -