घरमहाराष्ट्रशेतकरी आक्रोश करतोय हे लज्जास्पद - उद्धव ठाकरे

शेतकरी आक्रोश करतोय हे लज्जास्पद – उद्धव ठाकरे

Subscribe

ज्या वाटेवरून सरकार आले त्याच वाटेवर आता सुरुंग पेरले आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकरावर टीका केली आहे. 

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून, पुन्हा एकदा भाजप सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. राज्यात शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आक्रोशावरुन उध्दव यांनी भाजपवर निशाणा साधला आहेत. ”कर्जमाफी नाही की पीक विमा योजना नाही. कुठलीही मदत नाही, आता मदत मिळाली नाही तर, साहेब आम्ही सगळे आत्महत्या करू”, असा आक्रेश राज्याचा शेतकरी करत आहे. ही बाब  राज्य कारभारास लांच्छन आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. शेतकरी संतापला असून तो मनातून अशांत आहे, त्याची जगण्याची इच्छा मेली आहे तशी लढण्याची जिद्दसुद्धा संपली आहे, असं उद्धव यांनी म्हटलं आहे. आजपर्यंत शेतकर्‍याने अनेक लढे दिले पण हाती काहीच मिळाले नाही. आताही फडणवीस सरकार दुष्काळग्रस्तांसाठी प्रचंड घोषणाबाजी करत आहेत, शेतकरी मात्र मरणपंथाला लागला आहे. केंद्रीय दुष्काळ पथकाला महाराष्ट्रात ‘बॉडीगार्ड’ घेऊन फिरावे लागले. ज्या वाटेवरून सरकार आले त्याच वाटेवर आता सुरुंग पेरले आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकरावर टीका केली आहे.

सांगा साहेब आम्ही कसं जगायचं…

महाराष्ट्र राज्य मात्र दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे पण केंद्रीय मंत्रिमंडळ चार-पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचारात गुंतलं आहे. देशाचे संरक्षण राज्यमंत्री असलेले सुभाष भामरेही सध्या धुळ्यातच मुक्कामी आहेत. थोडक्यात ‘जवान’ आणि ‘किसान’ यांना वार्‍यावर सोडून पालिकांपासून विधानसभा निवडणुकांपर्यंत आमचे राज्यकर्ते गुंतले आहेत, अशी टीका उद्धव यांनी केली आहे. दुसरीकडे केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दुष्काळी दौर्‍यावर आले आहे. केंद्रीय पथकासमोर शेतकरी आपल्या व्यथा मांडत आहेत. ‘सांगा साहेब, आम्ही कसं जगायचं? प्यायला पाणी नाही की जनावरांना चारा नाही. सावकाराचं कर्ज काढलंय ते फेडायचं कसं? बँकेचंही कर्ज कढलंय. आमच्यावर विष प्यायची वेळ आली आहे’, अशी व्यथा करमाळ्याच्या जातेगावचा शेतकरी किसन वारे याने मांडली. किसनची व्यथा ही राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकर्‍याची व्यथा आहे, अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांची अवस्था बिकट

शिवसेना सरकारवर टीका करते, सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढते, असं ज्यांना वाटतं त्यांनी केंद्रीय पथकासमोर शेतकर्‍यांनी मांडलेल्या व्यथा समजून घ्याव्यात, असा सल्ला उद्धव यांनी दिला आहे. केंद्रीय पथकाशी शिवसेनेचा संबंध नाही व किसन वारे (67) सारखी मंडळी शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत. आम्ही जगायचे कसे? हा मोठा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना भेडसावत आहे. कापूस नाही, कांदा नाही, भाज्या नाहीत, फळे नाहीत अशी सध्याची अवस्था आहे. पावसाअभावी कापूस जळून गेला. कांदा उत्पादकाच्या खिशातला पैसा संपत आहे. शेतात राबायचे, अस्मानी-सुलतानी आव्हानांना तोंड देत पीक काढायचे आणि जेव्हा ते विकून उत्पन्न मिळवण्याची वेळ येते तेव्हा शेतमालास कवडीमोल भावाने विकण्याशिवाय शेतकर्‍यासमोर पर्याय राहत नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

शेतकऱ्याचा काय दोष?

केंद्राकडून महाराष्ट्राला दुष्काळी मदत हवी आहे व त्यासाठी केंद्राचे पथक राज्यात आले आहे. शेतकरी हवालदिल आहे व त्यांच्या संतापाचा उद्रेक होऊ नये म्हणून केंद्रीय पथकाला म्हणे कडेकोट बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, शेतकर्‍यांत संताप आहे याची खात्री सरकारला आहे. सरकार चालवायला जेथे शिर्डी संस्थानकडून कर्ज घ्यावे लागले तेथे शेतकर्‍यांचे प्रश्न कसे सोडवणार? असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. संजय साठे या निफाडच्या शेतकर्‍याने काय केले? निफाड बाजार समितीत कांद्याला प्रति किलो फक्त एक रुपया चाळीस पैसे भाव मिळाल्याने त्रासलेल्या संजय साठे यांनी साडेसात क्विंटल कांद्याचे एक हजार चौसष्ट रुपये पंतप्रधान निधीला पाठवले. संपूर्ण राज्याचे हे चित्र आहे. आता या शेतकर्‍याचा कांदाच कसा फालतू दर्जाचा होता हे सिद्ध करण्यासाठी सरकारी यंत्रणा धडपड करीत आहेत असा, आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -