निसर्गरम्य कोकणात जत्रेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांची प्रशासकीय लगबग

Mumbai

गेल्यावर्षी आंगणेवाडीच्या जत्रेला पक्षप्रमुख म्हणून आलेले उद्धव ठाकरे यंदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मसुरे गावच्या आंगणेवाडी येथील देवी भराडीच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित होते. मात्र यावेळी जत्रेसाठी निसर्गरम्य कोकणात आलेल्या मुख्यमंत्र्यांची प्रशासकीय बैठकांसाठीची लगबग पहायला मिळाली. त्यांचे बैठकांचे सत्र तळ कोकणच्या आधी रत्नागिरी जिल्ह्यापासून सुरू झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री ते पक्षप्रमुख अशी तारेवरची कसरत करत असताना ठाकरे यांच्यासह त्यांच्या नेत्यांची दमछाक होत होती. सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील काही प्रशासकीय बैठका उरकल्यावर मंगळवारी सिंधुदुर्गमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्री ठाकरे यांनी देवी भराडीचे दर्शन घेतले. यंदा गेल्या 10 वर्षांतील विक्रमी गर्दी या जत्रोत्सवाला झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र याबाबतची अधिकृत आकडेवारी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत व्यस्त असलेले पोलीस अधिकारी देऊ शकले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराचा परिसर सोडल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांचे जत्रोत्सव परिसरात आगमन झाले. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद टाळत मंगळवारी बोलणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी बरीच वर्षे रखडलेल्या मसुरेच्या पाणी योजनेची कागदपत्रे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली. बुधवारच्या शिवजयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री ठाकरे सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहेत. ज्या शिवसैनिकांनी गेल्या 15 वर्षांत कोकणात शिवसेनेचा भगवा फडवत ठेवण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी मुख्यमंत्री तळ कोकणात आणि खास आंगणेवाडीच्या जत्रेसाठी आले होते, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, खासदार उदय सामंत, आमदार दिपक केसरकर आणि वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेचे मुंबई आणि कोकणातील पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा नियोजनाचा घेतला आढावा
दरम्यान भराडी देवीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा नियोजन बैठकांच्या योजनांचा आढावा घेतला. पण ही माहिती त्यांनी पत्रकारांना न दिल्यामुळे भाजप नेते नारायण राणे यांनी त्यांना मुके मुख्यमंत्री असे संबोधले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोकणातील मासेमारांनी मासळी दुष्काळाबाबत भेट घेतली, तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांनाही आश्वासन दिले.