घरमहाराष्ट्रऔरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

Subscribe

केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री हरदिप पुरी यांनी याबाबतची माहिती दिली.

औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याची मागणी करणारे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे.

मागील काही दिवसांत नामांतरावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. शिवसेनेने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी लावून धरली आहे. शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने मात्र या मागणीला विरोध केला आहे. आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आहे, नामांतरासाठी नाही, असे काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम म्हणाले होते. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही नामांतरणाला विरोध असल्याचे बोलून दाखवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -