घरमहाराष्ट्रवाळूच्या भरधाव डंपरने चिरडले, झोपेतील मामा-भाच्याचा मृत्यू

वाळूच्या भरधाव डंपरने चिरडले, झोपेतील मामा-भाच्याचा मृत्यू

Subscribe

नंदुरबार तालुक्यातील घटना, अनियंत्रित डंपरने वाहनांसह बकऱ्यांनाही चिरडले

नंदुरबार तालुक्यातील नांदरखेडा गाव परिसरात वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने घरात झोपलेल्या मामा-भाच्याला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना मंगळवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. हा डंपर एवढ्या वेगात होता की, घराला धडक देण्यापूर्वी डंपरने घरासमोर बांधलेल्या काही बकऱ्यांना चिरडून उभ्या असलेल्या वाहनांचाही चुराडा केला.

प्रवीण बाबुलाल राठोड व विक्रम श्रावण जाधव अशी मृतांची नावे आहेत. या भागातून सातत्याने वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. सरकारी यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी मध्यरात्रीदेखील वाहतूक सुरू असते. अपघाताला कारणीभूत डंपरदेखील नांदरखेडा गावात नेहमीच ये-जा करतो. मंगळवारी मध्यरात्री नांदरखेडा गावानजीक असताना अचानक चालकाचा डंपरवरील ताबा सुटला आणि हा डंपर नियंत्रण करण्याच्या प्रयत्नात थेट रस्त्याखाली उतरून पुढे राठोड यांच्या घराच्या दिशेने गेला. या घरासमोरील वाहनांसह तेथे बांधलेल्या बकऱ्यांना चिरडत डंपर थेट भिंत तोडून घरात शिरला. या घटनेत राठोड आणि जाधव यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बुधवारी सकाळी गावकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त करत रस्ता रोको केला होता. महसूल यंत्रणांनी निदान आतातरी वाळू वाहतुकीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जाते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -