उरणचे मच्छीमार संकटात

खराब हवामानासह वादळाचा परिणाम

Mumbai

महाराष्ट्रात सर्वाधिक मच्छीमारांची संख्या असलेल्या या तालुक्यातील मच्छीमारांवर सध्या आर्थिक संकट घोंगावू लागले आहे. 1 ऑगस्ट रोजी मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यापासून सतत खराब हवामान आणि येणारी चक्रीवादळे यामुळे हंगाम वाया गेला आहे.तालुक्याला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्या अनुषंगाने करंजा, मोरा, दिघोडे, खोपटे, आवरे, गोवठणे, हनुमान कोळीवाडा, घारापुरी समु्द्रकिनार्‍यांच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमारीचा व्यवसाय केला जातो. एकट्या करंजा गावात सुमारे 1100 यांत्रिक नौका असून, हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. मात्र यावर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मच्छीमारीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रातून मच्छीमारी न करताच परतावे लागले आहे. याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नावर झाला आहे.

ट्रॉलर किंवा पर्सोनेट नौकेला मच्छीमारीला जाताना साधारणपणे 2 लाख रुपये खर्च येतो. डिझेल, बर्फ, खलाशांची मजुरी आणि त्यांचा नाश्ता-जेवणाचा खर्च यात असतो. मात्र मच्छीमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून मच्छीमारांच्या नौका वादळ आणि खराब हवामान यामुळे अनेक वेळा परत आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा झालेला खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे सध्या प्रत्येक नौका मालकांवर 10 ते 12 लाखाचे कर्ज झाले आहे. त्यातच गेल्या वर्षभरापासून शासनाने या मच्छीमारांना डिझेलचा परतावासुद्धा दिला नसल्यामुळे मोठ्या अर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. मच्छीमार अडचणीत सापडल्यामुळे त्या व्यवसायावर आधारीत खलाशी, मच्छी विक्रेते, टेम्पोचालक, जाळी आणि साहित्य विक्री करणार्‍यांचे व्यवसाय देखील अडचणीत आले आहेत.

उरण तालुक्यात मच्छीमारांसाठी लॅण्डींग पॉइंट चांगला असल्यामुळे आणि मुंबईसारखी बाजारपेठ जवळ असल्यामुळे व्यवसाय चांगला फोफावला आहे. मात्र या हंगामात सतत येणारी वादळे आणि खराब हवामान यामुळे मत्स्य उत्पादनात घट झाली आहे. मासेमारीसाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने नफा सोडून द्या, पण खर्चही निघत नाही. यामुळे सध्या मच्छीमारांवर या तीन महिन्यांत 10 ते 12 लाखांचे कर्ज झाले आहे. शासनाने त्याला अर्थिक अडचणीतून बाहेर करण्यासाठी मत्स्य दुष्काळ जाहीर करून अर्थिक मदत करावी.
-भालचंद्र कोळी, चेअरमन, करंजा मच्छीमार सोसायटी