घरमहाराष्ट्रवादळामुळे उरण लाँच सेवा बंद

वादळामुळे उरण लाँच सेवा बंद

Subscribe

महा चक्रीवादळ मुंबई आणि उत्तर कोकणाजवळ घोंघावत असल्यामुळे येणारे काही दिवस समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहेत. त्यामुळे उरणकडून जाणारी मोरा-भाऊचा धक्का ही लाँचसेवा आणि करंजा ते रेवस ही ‘तर’ सेवा शुक्रवार 8 नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा आज किंवा उद्या राज्याच्या किनारपट्टी भागात परिणाम दिसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने समुद्रात तीन क्रमांकाचा बावटा लावल्याने या दोन्ही जलवाहतूक सेवा बुधवारी सकाळपासून बंद करण्यात आल्या आहेत.

समुद्रातील वातावरण आणि महा चक्रीवादळाचा परिणाम कमी झाल्यानंतर ही जलवाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. या दोन्ही जलसेवा उरणकरांसाठी महत्त्वाच्या आहेत. रोज हजारो चाकरमानी आणि छोटे व्यावसायिक या जलमार्गाचा वापर करतात.

- Advertisement -

ही जलवाहतूक बंद झाल्यामुळे या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. मुंबई-अलिबाग, मांडवा ते मुंबई ही जलसेवादेखील बंद झाली असल्याने अलिबाग येथील व्यावसायिकांसह चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. या चक्रीवादळाचा धसका मच्छीमारांनीही घेतला असून, शेकडो नौका किनार्‍यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -