घरमहाराष्ट्रनाशिकफेस अ‍ॅप्सने आणला तोंडाला फेस

फेस अ‍ॅप्सने आणला तोंडाला फेस

Subscribe

वापरकर्त्यांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे कट झाल्याचा अनेकांचा अनुभव

तरुण दिसण्यासाठी आपले फोटो गोरेगोमटे करून ‘प्रोपाईल’ वा ‘डीपी’वर झळकवणार्‍या तरुणाईला आजकाल अचानक म्हातारे दिसण्याचे डोहाळे लागले आहेत. यासाठी गुगल प्लेवर अनेक अ‍ॅप्लिकेशन्सनी ठाण मांडले आहे. सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच या अ‍ॅप्सने वेड लावले आहे. मात्र, या अ‍ॅप्समुळे राज्यभरातील काही तरुणांच्या खिशाला चट्टीही बसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अ‍ॅप डाऊनलोड करताच तीन दिवसांनंतर तब्बल सात हजार रुपये बँकेच्या अकाऊंटमधून अ‍ॅपच्या कंपनीला जमा झाल्याचा या तरुणांचा अनुभव आहे. त्यामुळे फेस अ‍ॅपने संबंधित तरुणांच्या तोंडाला फेस आणल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

समाज माध्यमांवर आपले वय लपवण्याची जणू स्पर्धाच सुरू असते. त्यासाठी अनेक वापरकर्ते आपल्या खोट्या जन्मतारखा टाकून स्वत:ला तरुण म्हणून दर्शवित असतात. परंतु सध्या चलती असलेल्या फेस अ‍ॅप्सने वय वाढवून फोटो टाकण्याची जणू स्पर्धा सुरू केली आहे. या अ‍ॅप्समध्ये एकदा आपला फोटो अपलोड केल्यास एकतर कमी वयाचा फोटो किंवा सध्यापेक्षा अधिक वयाचा फोटो एडीट करुन मिळतो. पण तरुण दिसण्याच्या भानगडीत फारसे कुणी दिसत नाही तर प्रत्येकाला आपण म्हातारपणी कसे दिसू याचे पडलेले असते. तसे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट केले जात आहेत. मात्र हे अ‍ॅप डाऊनलोड करणार्‍या अनेकांना आर्थिक भुर्दंडही बसल्याचा आजवरचा अनुभव आहे. विशेषत: फेस मी या अ‍ॅपवरुन पैसे कट होत असल्याचे वापरकर्त्यांनी सांगितले.

- Advertisement -

अज्ञानातून आर्थिक फटका

साधारणत: विनामुल्य उपलब्ध असणारे अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यात वापरकर्त्यांचा कल दिसून येतो. परंतु अनेक फेस अ‍ॅप्स सशुल्क आहेत, याची माहितीच वापरकर्त्यांना नसते. किंबहुना ते याची माहिती करून घेत नाहीत. ‘गुगल पे’वरून यापूर्वी कधी व्यवहार केले असतील किंवा गुगल प्ले स्टोअरमध्ये तुमच्या डेबिट वा क्रेडिट कार्डसंदर्भातील माहिती सेव्ह असेल तर अ‍ॅप डाऊनलोड करताच आपल्या बँकेतून सात हजार रुपये संबंधित अ‍ॅप कंपनीच्या खात्यात थेट वर्ग होतात. त्यासाठी वन टाइम पासवर्ड अर्थात ओटीपी देखील विचारला जात नाही. पैसे कापले गेल्याचा संदेश जेव्हा वापरकर्त्याला मोबाइलमध्ये मिळतो, तेव्हा मात्र पश्चातापाशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो.

खासगी माहितीचा होऊ शकतो गैरवापर

हे अप्लिकेशन इन्स्टॉल करताना प्रथमत: कॅमेरा आणि व्हीडिओची परवानगी मागते. सोबतच तुमचे नाव, तुम्हाला काय आवडतं या गोष्टींची देखील परवानगीदेखील मागितली जाते. वापरकर्र्ते या छोट्या बाबींचा फारसा विचार न करता सर्रास परवानगी देऊन मोकळे होतात. नेमकी हीच बाब वापरकर्त्याची खासगी माहिती धोक्यात आनते. वापरकर्ता जर दिलेल्या सर्वच पर्यायांना क्लिक करीत असेल तर त्यामध्ये मीडिया स्टोरेजचा देखील समावेश आहे. त्यामुळे हे अ‍ॅप आपल्या परवानगीविना मोबाईलमधील माहिती वा फोटो, व्हिडिओचा वापर करु शकतात. त्यात भरीस भर म्हणून अप्लिकेशनमधील ओल्ड एज फिल्टर वापरावयाचे असल्यास अप्लिकेशन काही पैसे यासाठी आकारले जातात.

- Advertisement -

पैसे परत आणण्यासाठी हे करा

पैसे कट झाल्यावर ‘गुगल प्ले’चा मेल आपणास प्राप्त होतो. त्यात ‘ऑर्डर हिस्ट्री’ नावाचा पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यास संबंधित अ‍ॅपचा लोगो येतो. त्याच्या उजव्या बाजूने उभे तीन बिंदू दिसतात. त्यावर क्लिक केल्यास ‘रिपोर्ट प्रॉब्लेम’चा पर्याय येतो. यात तुमच्याकडून अनावधनाने हे अ‍ॅप विकत घेतले गेले आहे किंवा अन्य काही कारणे येतात. यातील अनावधानाने या पर्यायावर क्लिक केल्यास आपल्या समस्येचे स्वरुप त्यात टाईप करुन ते सबमिट करावेे. त्यानंतर ‘गुगल प्ले’चा नवा मेल आपणास प्राप्त होतो. त्यानंतर २४ तासांच्या आत आपले पैसे परत मिळू शकतात. मात्र ४८ तासांच्या आतच हे पैसे मिळवण्यासाठी प्रक्रिया राबवावी लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -