घरमहाराष्ट्रकेव्‍हाही होऊ शकते वारीस पठाणांना अटक

केव्‍हाही होऊ शकते वारीस पठाणांना अटक

Subscribe

गृह विभागाकडून गंभीर दखल

15 कोटी 100 कोटींवर भारी पडू, या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असे संकेत दिले जात आहेत. धर्मा-धर्मात तेढ निर्माण करणारे जाहीर वक्तव्याचे देशभर जोरदार पडसाद उमटल्यावर राज्य सरकारने वारीस यांच्या विरोधात कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. वारीस यांच्या वक्तव्याचा तपशील मागवण्यात आला असल्याचे सांगताना जाहीर झालेले त्यांचे वक्तव्य चुकीचेच असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

वारीस यांनी सीएए आणि एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक येथे गुलबर्गामध्ये जाहीर सभेत आम्ही 15 कोटी 100 कोटींवर भारी पडू, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर वारीस यांच्यावर देशभर टीकेची झोड उठवली जात आहेे.

- Advertisement -

समाजमाध्यमांमध्ये वारीस चांगलेच ट्रोल झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वारीस यांच्या अटकेची मागणी केली. आता याची गंभीर दखल घेत धर्माधर्मात तेढ निर्माण करणार्‍या वक्तव्यांची पडताळणी करण्याचा इरादा गृह मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

वारीस पठाण यांनी माफी टाळून विधान घेतले मागे!

गेल्या काही दिवसांपासून एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून त्यावरून त्यांच्यासह एमआयएम पक्षाविरुद्ध देशभरातून संतापाचे वादळ उठले आहे. देशवासियांचा संताप वाढत चालल्याचे लक्षात घेऊन अखेर वारीस पठाण यांनी आपले विधान मागे घेतले. तसेच, ‘मी सच्चा देशभक्त आहे’, असेदेखील वारीस पठाण यांनी शनिवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. देशात इतके वादळ उठल्यानंतर पठाण त्याबद्दल माफी मागतील किंवा दिलगिरी व्यक्त करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती, पण पठाण यांनी तसे काही केले नाही. उलट, पत्रकारांच्या प्रश्नांना झुगारून ते निघून गेले.

- Advertisement -

कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये काही दिवसांपूर्वी वारीस पठाण यांनी भाषणादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ईंट का जवाब पत्थरसे देना सीख लिया है हमने. बस साथ में चलना पडेगा. आजादी लेनी पडेगी, अगर मांगने से नहीं मिलती तो छीनकर लेनी पडेगी. आम्हाला म्हटले गेले, आया-बहिणींना पुढे केले, पण त्यांना सांगेन की आत्ता फक्त वाघिणी बाहेर पडल्या आहेत, तितक्यात तुम्हाला घाम फुटला. जर सगळे बाहेर पडलो, तर काय होईल? आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींवर भारी आहोत, हे लक्षात ठेवा’, असा इशारा वारीस पठाण यांनी स्टेजवरून दिला होता.

माझ्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून बातम्या सुरू आहेत. असे चित्र उभे केले जात आहे की, मी देशद्रोही आहे. गुलबर्गामध्ये मी जे म्हणालो, त्याचा हा अर्थ अजिबात असा नव्हता की मी ते हिंदूंबद्दल बोललो. माझ्या म्हणण्याचा हाच हेतू होता की १५ कोटी मुस्लिमांसोबत संविधानावर विश्वास असलेले इतरही लोक नाराज आहेत. देशातले फक्त १०० लोक असे आहेत जे १५ कोटी मुस्लिमांविरोधात दिसत आहेत. मग ते कुठल्याही पक्षाचे असोत. मी या १०० लोकांचाच उल्लेख केला होता. या १०० लोकांमध्ये काही पत्रकारदेखील आहेत. हे लोक देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. मी एक सच्चा मुसलमान आहे, देशभक्त आहे.

माझ्या देशभक्तीबद्दल कुणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. मी कधीही कोणत्या धर्मावर टीका केलेली नाही. मी सगळ्या धर्मांचा आदर करतो. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. पण तरीही जर माझ्या शब्दांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द मागे घेतो. फक्त मी या देशाचा सच्चा नागरिक आहे म्हणून मी हे करतोय, असे पठाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास नकार देऊन ते निघून गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -