राज्यपालांची भूमिका योग्यच; मात्र पत्रव्यवहारात अदब हवी होती – प्रकाश आंबेडकर

राज्यात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई

vba prakash mabedkar

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रव्यवहारावर भाष्य केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका योग्यच आहे. केंद्राच्या निर्णयाचं पालन होतं की नाही, हे पाहण्याचा आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना जे प्रत्युत्तर दिलंय त्याचा आशय केवळ मंदिर उघडण्याबाबतचा आहे, असं सांगतानाच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रव्यवहारात अदब पाळला गेला नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

मंदिरं उघडण्यावरुन भाजप शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन घेरायचा प्रयत्न करत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केला. याला उद्धव ठाकरे यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. या सर्व घडामोडींवर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रव्यवहारात अदब पाळला गेला नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. महाराष्ट्रात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरु आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

यावेळी हिंदुत्वावर देखील भाष्य केलं. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. ते त्यांच्या हिदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहेत. केवळ महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. भाजपने सुरू केलेलं मंदिर आंदोलन आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत शाब्दिक चकमक सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे.


हेही वाचा – माझ्या हिंदुत्वाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही; मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना खरमरीत उत्तर