पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना भाजपने दिली मोठी जबाबदारी; नाराज नेत्यांचे पुर्नवसन

भाजपने आपल्या संघटनात्मक स्तरावर महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. दिवाळीच्या मुहुर्तावर अनेक राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी नेमण्यात आले आहेत. राज्य भाजपवर नाराज असलेल्या पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचे राष्ट्रीय कार्यकारिणीत पुर्नवसन करण्यात आले होते. आत त्यांच्यासह विजया रहाटकर आणि सुनील देवधर यांनाहना नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपने आज ३६ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी पक्षाचे प्रभारी आणि सह प्रभारींची सूची जारी केली आहे. यानुसार महाराष्ट्रातील अनेक नेत्यांकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये विनोद तावडे यांची हरियाणा प्रदेश भाजप प्रभारीपदी, पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेश सह प्रभारी पदी, सुनील देवधर यांची आंध्रप्रदेश सह प्रभारी पदी आणि विजया रहाटकर यांची दमन दीव – दादरा – नगर हवेली प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचे प्रभारीपदी सी.टी. रवी यांची नेमणूक केली आहे. रवी यांच्याकडे महाराष्ट्रासह गोवा आणि तामिळनाडूचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तर येत्या काळात महत्त्वाच्या असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदी राधा मोहन सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पश्चिम बंगालची जबाबदारी कैलास विजयवर्गिय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर भाजपने आपला मोर्चा इतर राज्यांकडे पुन्हा वळविला आहे. पुढील काळात पश्चिम बंगाल आणि त्यानंतर उत्तर प्रदेश राज्यात निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार निवडणुकीत प्रभारीपदी नियुक्त केल्यानंतर भाजपला चांगला निकाल मिळाला होता. त्यामुळे आता मुंडे, तावडे काय कामगिरी करुन दाखवितात हे पाहावे लागेल.