घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टसांगलीचा पेच काँग्रेसनं अखेर सोडवला, विशाल पाटील लढवणार निवडणूक!

सांगलीचा पेच काँग्रेसनं अखेर सोडवला, विशाल पाटील लढवणार निवडणूक!

Subscribe

सांगलीच्या एका जागेचा वाद अखेर काँग्रेसनं मिटवला असून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सांगलीमध्ये उमेदवारीवरून सुरु झालेल्या राजकीय गोंधळाचा शेवट विशाल पाटील यांच्या उमेदवारीच्या घोषणेने झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. या जागेवरून काँग्रेसअंतर्गत मोठा गोंधळ उडाला होता. तसेच, राजू शेट्टींनी देखील आग्रह लावून धरला होता, कोणत्याही परिस्थितीत हातकणंगलेसोबत आणखी एक जागा मिळवण्यावर राजू शेट्टी अडून बसले होते. वर्ध्याची जागा चारूलता टोकस यांच्यामुळे राजू शेट्टींना सोडणं शक्य नव्हतं. त्यामुळे सांगलीमध्ये सुरू असलेला गोंधळ टाळण्यासाठी काँग्रेसने सांगलीचीच जागा स्वाभिमानीसाठी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामध्ये काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचाच एका अर्थाने विजय झाला आहे.

काय होता सांगलीचा पेच?

सांगलीची जागा राजू शेट्टींना सोडणार याची कुणकुण लागलेल्या माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. वसंतदादा पाटील यांचे नातू असलेले प्रतीक पाटील आण विशाल पाटील यांच्यामध्ये उमेदवारीसाठी चुरस होती. तिकडे पतंगराव कदमांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांनीही उमेदवारीची तयारी केली होती. मात्र, जागावाटपामध्ये जागा स्वाभिमानीला जाणार हे कळताच स्थानिक काँग्रेसमध्ये बंडाळीला सुरुवात झाली. याचा फटका निवडणुकांमध्ये बसणार हे लक्षात आल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने मध्यस्थी करायला सुरुवात केली.

- Advertisement -

हेही वाचा – सांगलीतला घराणेशाहीचा वाद

अगदी शुकवारी रात्रीपर्यंत याविषयी नक्की निर्णय होऊ शकत नव्हता. अखेर काँग्रेस नेतृत्वाने रात्री उशीरा राजू शेट्टींशी चर्चा करून यावर तोडगा काढला. आता विशाल पाटील काँग्रेसमध्येच असतील मात्र निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर आणि एबी फॉर्मवर लढवणार आहेत. स्वत: राजू शेट्टींनीच ही माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर विशाल पाटीलच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. याआधीही पालघरमध्ये भाजपच्या खासदारानं शिवसेनेची उमेदवारी घेतली. साताऱ्यात भाजपच्या उमेदवारानं शिवसेनेची उमेदवारी घेतली आहे. याआधीही असे प्रकार घडले आहेत.

राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

काँग्रेसचे एकाच दगडात २ पक्षी!

दरम्यान, या निर्णयातून काँग्रेसने एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचं बोललं जात आहे. एकीकडे राजू शेट्टींची दोन जागांची मागणी काँग्रेस पक्षाचं फार काही नुकसान न करता पूर्ण केली आहे. दुसरीकडे विशाल पाटलांना उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षांतर्गत वसंतदादा पाटील गटाला शांत करण्यात यश मिळवलं. त्यामुळे प्रतीक पाटलांनी काँग्रेस सोडल्यामुळे होणारं नुकसान भरून काढलं आहे. आता जिल्ह्यातले दोन मोठे गट शांत झाल्यामुळे पतंगराव कदम गट आपोआप शांत झाला असून सांगलीतले सर्व काँग्रेसी गट शांत करण्यात पक्षाला यश आलं आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -