घरCORONA UPDATEकोरोनाग्रस्त बाधित क्षेत्रांवर आता सीसीटीव्हीचा वॉच!

कोरोनाग्रस्त बाधित क्षेत्रांवर आता सीसीटीव्हीचा वॉच!

Subscribe

महापालिकेचे अधिकारी व पोलिस सी.सी.टिव्हीद्वारे लक्ष ठेवणार असून ‘बाधित क्षेत्रा’मध्ये जर कोणी फिरत असेल तर थेट पोलिसांच्या मोबाईलवर लघुसंदेश अर्थात एसएमएस जाईल आणि पोलिस येवून अशा फिरणाऱ्यांची गचांडी पकडून थेट कारवाई करतील.

कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यास तेथील इमारतीस आसपासचा परिसर ‘बाधित क्षेत्र’ म्हणून जाहीर करून प्रतिबंधित करण्यात येते. त्यामुळे अशाप्रकारे प्रतिबंधित क्षेत्रांवर महापालिकेचे अधिकारी व पोलिस सी.सी.टिव्हीद्वारे लक्ष ठेवणार असून या ‘बाधित क्षेत्रा’मध्ये जर कोणी फिरत असेल तर थेट पोलिसांच्या मोबाईलवर लघुसंदेश अर्थात एसएमएस जाईल आणि पोलिस येवून अशा फिरणाऱ्यांची गचांडी पकडून थेट कारवाई करतील.

‘कोरोना कोविड १९’ या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिका सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून ज्या भागात बाधितांची व ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या तुलनेने अधिक आहे, अशा परिसरांमध्ये ‘कंटेनमेंट झोन’ अर्थात ‘बाधित क्षेत्र’ तयार करण्यात आले आहेत. या ‘बाधित क्षेत्रा’तील नागरिकांना त्यांच्या परिसरा बाहेर न जाण्याच्या तसेच बाहेरील परिसरातील नागरिकांना त्या परिसरात न‌‌ जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

बाधित क्षेत्राबाबत देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खातरजमा नियमितपणे करता यावी,  यासाठी या परिसरांत ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाचे नियमित अवलोकन महापालिकेच्या व पोलिसांच्या कंट्रोल रूममधून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या निगराणीसाठी प्रथमच ‘व्हिडिओ अँनॅलिटिक्स’ या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. यामुळे ‘बाधित क्षेत्र’ परिसरात एखाद्या ठिकाणी काही व्यक्ती कॅमेऱ्यात आढळून आल्यास, किंवा एखादा व्यक्ती विनाकारण रेंगाळत असल्यास, संगणकीय प्रणालीद्वारे स्वयंचलित पद्धतीने त्याचे अवलोकन होऊन पोलिसांना ‘एसएमएस’द्वारे सूचना दिली जाणार आहे.

तसेच  ‘बाधित क्षेत्र’ परिसरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा बाहेरील परिसरातून ‘बाधित क्षेत्र’ परिसरात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचेही अवलोकन या कॅमेऱ्याद्वारे स्वयंचलित पद्धतीने केले जाणार आहे. तसेच याची सूचना पोलिसांना स्वयंचलित पध्दतीने ‘एसएमएस’द्वारे प्राप्त होऊ शकणार आहे. या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या पाहणीचा अहवाल हा मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांना नियमितपणे पाठविण्यात येणार आहे.

- Advertisement -

वारंवार सूचना देऊन देखील अजूनही काही ठिकाणी नागरिक ‘बाधित क्षेत्र’ परिसरातून बाहेर पडताना किंवा परिसरात जाताना आढळून येत आहेत. मात्र आता ‘व्हिडिओ अॅनिलिटिक्स’ या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येत असल्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोषींवर अधिक प्रभावीपणे आणि वेळच्या वेळी कारवाई करणे शक्य होणार आहे. या कारवाई अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -