घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका होणार तरी कोण?

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका होणार तरी कोण?

Subscribe

सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमकं कोण होणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. दरम्यान, या आठवड्याभरात घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींची थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे राष्ट्रवादीला ५४ जागांवर आणि काँग्रेसला ४४ जागांवर आलेले यश तर दुसरीकडे भाजपची १०५ जागांवर झालेली घसरण या साऱ्या गोष्टींमुळे शिवसेनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत फक्त ५६ जगांवर यश आले असले तरी शिवसेना आता महाराष्ट्राच्या राजकारणात भाव खावून जाणारा पक्ष ठरला. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता स्थापनेसाठी पुरेशा जागा उपलब्ध होत्या, त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या मदतीशिवाय सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. आता सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेनेशी युती करणे प्रचंड गरजेचे आहे. मात्र, आता शिवसेनेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शिनसेनेला मंत्रीमंडळात ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्मुला हवा आहे तर मुख्यमंत्रीपदासाठी देखील अडीच-अडीच वर्ष वाटून घ्यावी, अशी मागणी शिवसेनेची आहे.

काँग्रेस शिवसेनेसोबत युती करण्यास तयार

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरु असली तरी काँग्रेसने सत्ता स्थापनेसंर्भात एक गुगली टाकली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर शिवसेना आघाडीसोबत युती करुन सत्ता स्थापन करु शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती.

- Advertisement -

राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसण्यावर ठाम

शिवसेना आघाडीसोबत जावू शकते, अशी शक्यता वर्तवली जात असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पवारांची ही भूमिका राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाची ठरली. सत्ता स्थापनापेक्षा राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसणार, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेचा आघाडीचा दरवाजा बंद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. याशिवाय आता शिवसेना आणि भाजपला एकमेकांशिवाय पर्याय नाही, असे बोलले जाऊ लागले. मात्र, त्यानंतरही शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, भाजपने शिवसेनेच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर शिवसेना पर्यायी मार्गांचा वापर करेल. सत्तारांचे हे बोलणे अत्यंत सूचक होते. मात्र, तरीदेखील भाजप यावर काय भूमिका घेईल? याकडे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असे बोलले जात होते.

सेना-भाजप मुख्यमंत्रीपदाची बैठक रद्द

राज्यभरात मोठ्या जोशात आणि उत्साहात दिवाळी साजरी केली जात असताना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी सुरु होत्या. इकडे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ४ अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा सांगितला तर भाजपला देखील ८ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला. मंगळवारी सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, पत्रकारांना दिलेल्या खासगी मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आपणच होणार असल्याचे सांगितले. याशिवाय शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाबाबत आपल्याशी काही चर्चा झालेली नसल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहा यांच्यासोबत काही चर्चा झाली असेल तर ती आपल्याला ठाऊक नाही. त्यामुळे या विषयावर भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे सेना-भाजपची सत्ता स्थापनेची बैठक शिवसेनेकडून रद्द करण्यात आली, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे मानले आभार

या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, आज विधीमंडळात भाजपची विधीमंडळ पक्षनेतेपद निवडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. यावेळी भाजपच्या आमदारांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘युतीचेच सरकार निर्माण होणार त्यामुळे कुणीही काळजी करु नये’, असे सूचक वक्तव्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे देखील आभार मानले.

शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळणार?

या सर्व राजकीय नाट्यानंतर आता शिवसेना बॅकफूटवर येईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर युती झाली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद आणि तेरा मंत्रीपदे मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे वरळी मतदारसंघातून निवडून आलेले आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पद नाही मिळाले तरी त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात कमी वयाचे उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे ठरणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -