घरताज्या घडामोडीएकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने भाजपसमोर मोठा खड्डा!

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने भाजपसमोर मोठा खड्डा!

Subscribe

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी विरोधी पक्षनेते नाथाभाऊ खडसे अखेर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. खडसेंच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसणार आहे. एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते असल्यापासून भारतीय जनता पक्षाचे अत्यंत कणखर आणि प्रभावी नेते म्हणून त्यांचा उल्लेख व्हायचा. जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे रुजली नव्हती तेव्हापासून एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते पक्षाला उभारी देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. काँग्रेस पक्षाची राजवट राज्यात असताना त्या राजवटीत समोर एकाकी लढा देणारे म्हणून एकनाथ खडसे यांचा भाजपचे सगळेच नेते आणि कार्यकर्ते आवर्जून उल्लेख करतात. यामुळेच भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये चांगली पकड घेता आली.

वारंवार झाला खडसेंचा अपेक्षाभंग!

मात्र, राज्यात सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची संधी मिळायची वेळ येताच राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी खडसेंना डावलले. सत्ता आल्यावर भारतीय जनता पक्षाकडून विदर्भातील नेते देवेंद्र फडणवीस यांना या पदावर बसवण्यात आले. फडणवीस तसे पक्षात ज्युनियर. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू असल्याच्या एकमेव निकषावर त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आले. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर इतरांना कामाची संधी देण्याचे कर्तव्य फडणवीस विसरले. यातूनच महसूल मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांचा पीए समजल्या जाणाऱ्या गजानन पाटील या इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट मंत्रालयाच्या गेटवर ताब्यात घेतले. कुठल्याशा कामासाठी ३० लाख रुपयांची मागणी केली, असा त्यांच्यावर आरोप होता. मात्र तो सिद्ध होऊ शकला नाही. चौकशीमध्ये खडसे यांच्यावरील आरोप हे फेटाळण्यात आले आणि त्यांना क्लीनचिट देण्यात आली. यामुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये खडसेंना पुन्हा घेतले जाईल, अशी खात्री कार्यकर्त्यांना होती. परंतु खडसे यांना तिथेही संधी देण्यात आली नाही.

- Advertisement -

उमेदवारीवरूनही झालं राजकारण

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये खडसे यांना जळगावच्या मुक्ताईनगर या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी दाट शक्यता होती. परंतु निवड समितीने खडसे यांना उमेदवारी दिली नाही. खडसे यांच्या बरोबरच स्पर्धेत नावे येणाऱ्या विनोद तावडे, गडकरी समर्थक असलेले चंद्रशेखर बावनकुळे अशा ज्येष्ठ नेत्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. न मागताही खडसे यांची कन्या रोहिणी यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांना आणि परळीत पंकजा मुंडे यांना कोणतीही मदत न करता उलट विरोधकांना फूस देण्यात आली. यामुळे मुक्ताईत रोहिणी आणि परळीत पंकजा यांचा दारूण पराभव झाला.

पुढे खडसे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेतला जात असताना खडसे यांना दिल्लीत पाचारण होण्यास सांगण्यात आले. तेव्हाही प्रदेशमधून विरोधी सूर आळवण्यात आला. यानंतर असलेल्या विधान परिषद निवडणुकीत संधी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही तसा शब्द खडसेंना दिला होता. मात्र अखेरपर्यंत त्यांना ताकास तूर लागू दिला नाही. शेवटी त्यांना इथेही तिकीट कापण्यात आलं. शेवटी त्यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीची वाट धरली!

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -