घरट्रेंडिंगलोणारचं जगप्रसिद्ध सरोवर गुलाबी का झालंय? वाचा शास्त्रीय कारण!

लोणारचं जगप्रसिद्ध सरोवर गुलाबी का झालंय? वाचा शास्त्रीय कारण!

Subscribe

निसर्गाचा चमत्कार म्हणून लोकांमध्ये लोणार सरोवराच्या गुलाबी रंगाबाबत मोठी उत्सुकता आहे. त्याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. खरंतर पाण्याचे नमुने प्रत्यक्ष तपासल्याखेरीज निश्चित कारण सांगणे योग्य नाही, परंतु हे का घडले असावे? याच्या शक्यता नक्कीच सांगता येतील.

लोणार सरोवराबाबत…

लोणार सरोवर हे सुमारे साठ हजार वर्षांपूर्वी अशनी वर्षावामुळे तयार झाले आहे. बेसॉल्ट खडकात (आपला काळा पाषाण) असलेले अशा प्रकारे तयार झालेले हे एकमेव सरोवर. त्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे क्षारयुक्त पाणी. त्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने ते अल्कधर्मीय आहे. ते किती अल्कधर्मीय आहे हे ‘पीएच’ या घटकावरून समजते. ७ – ७.५ च्या आसपास पीएच असणे म्हणजे सामान्य पाणी. त्याचा पीएच सातपेक्षा कमी झाला की ते आम्लधर्मीय (Acidic) मानले जाते, तर ७.५ च्या पुढे पीएच असलेले पाणी अल्कधर्मीय (Basic) मानले जाते. लोणारच्या सरोवराचा पीएच पूर्वी १२ पेक्षाही जास्त होता. सध्या तो १०.५ च्या आसपास असतो. अशी सरोवरे गुलाबी होऊ शकतात.

- Advertisement -

इतर गुलाबी सरोवरे

गुलाबी रंगाची सरोवरे असणे ही काही नवी गोष्ट नाही. जगात अशी अनेक सरोवरे आहेत. बोलिव्हिया देशातील कोलोराडा, ओस्ट्रेलियातील हीलर, हट, रशियातील सिवाश ही त्याची प्रमुख उदाहरणे. इस्रायलमधील सुप्रसिद्ध मृत समुद्राचे पाणी देखील काही वेळा गुलाबी झाल्याच्या नोंदी आहेत. सर्वसाधारणपणे सांगायचे झाले तर क्षारांचे प्रमाण जास्त असलेले पाण्याचे साठे अनेक वेळा गुलाबी रंग धारण करत असल्याचे आढळून येते. समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करण्यासाठीच्या मीठागरांचे पाणीही गुलाबी झाल्याची उदाहरणे आहेत.

गुलाबी रंग देणारे सूक्ष्मजीव

यापैकी काही स्थळांचा शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. त्यातून पाणी गुलाबी असण्याची कारणे समजली आहेत. प्रमुख कारण म्हणजे त्या पाण्यात वाढणारे सूक्ष्मजीव आणि त्यांनी तयार केलेली रंगद्रव्ये. यामध्ये आजपर्यंत तीन प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा प्रमुख सहभाग असल्याचे आढळून आले आहे –

- Advertisement -

१. डुनालियेला सलीना या प्रकारची एकपेशीय शेवाळ (अल्गी)
२. हॅलोबॅक्टेरीएसी या वर्गातील जीवाणू आणि
. सलिनी बॅक्टेरियम या वर्गातले जीवाणू

हे सर्व सूक्ष्मजीव विशिष्ट प्रकारची रंगद्रव्ये तयार करतात. त्यांच्यामुळे पाण्याला गुलाबी रंग येतो. डुनालियेला सलिनाची रंगद्रव्ये बिटा कॅरोटीन प्रकारची रंगद्रव्ये तयार करतात. हॅलोबॅक्टेरीएसी ५० कार्बनचे अणू असलेली बॅक्टेरीओरुबिन प्रकारची, तर सलीनीबेक्टर कार्बनचे ४० अणु असलेली सलिनिजांथिन प्रकारातली रंगद्रव्ये तयार करतात.

काही विशिष्ट परिस्थितीत या जीवांची संख्या वाढते किंवा संख्या तीच राहते, पण ते जास्त प्रमाणात रंगद्रव्य तयार करतात आणि हा गुलाबी रंग जास्त प्रकर्षाने जाणवतो. यातले एक कारण म्हणजे तापमानाची वाढ. तापमान वाढले की तलावातल्या पाण्याचे बाष्पीभवन होते. पाणी कमी उरल्यामुळे त्यात क्षारांचे प्रमाण वाढते. ही परिस्थिती या जीवांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते आणि पाण्याचा रंग गुलाबी होतो.

लोणारमध्येही हेच झाले असण्याची शक्यता आहे. आम्ही स्वत: आणि इतरांनीही केलेल्या अभ्यासात लोणारमधे हॅलोबॅक्टेरीएसी वर्गातील सूक्ष्मजीव सापडले आहेत. तळ्यातले पाणी कमी झाल्यामुळे क्षारता वाढली आसावी आणि या जीवाणूंची संख्या वाढल्यानेच पाण्याला गुलाबी रंग आल्याची शक्यता आहे. पण नमुन्यांचा प्रत्यक्ष अभ्यास केल्यावरच निश्चित निष्कर्ष काढता येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -