घरमहाराष्ट्रझोपेतच नवऱ्याला पेट्रोल ओतून पत्नीने जिवंत जाळले!

झोपेतच नवऱ्याला पेट्रोल ओतून पत्नीने जिवंत जाळले!

Subscribe

नवऱ्याला जिवंत जाळून फरार झालेल्या बदलापूरमधील पत्नीला पोलिसांनी पुण्याच्या ससून रुग्णालयातून अटक केली आहे.

एक आठवडयापूर्वीच बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खोलीला आग लागून त्यात एका इसमाचा जळालेला मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्यावेळी त्या इसमाची पत्नी त्या ठिकाणाहून पसार झाल्यामुळे बदलापूर पश्चिम पोलीस तिचा शोध घेत होते. अखेर त्या पत्नीनेच आयकर विभागात कामाला असलेल्या तिच्या पतीला जाळून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने त्या महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातून धूर आला आणि शेजारी धावले!

मिळालेल्या माहितीनुसार नेवीमधून सेवानिवृत्त झालेले आणि सध्या दिल्ली येथील आयकर विभागात कामाला असलेले गुड्डूसिंग दरबारी यादव (४२) हे पत्नी सुनीता यादव (३८) हिच्यासोबत बदलापूर पश्चिम येथील साई आर्केड सोसायटीत ६ दिवसांपूर्वी राहायला आले होते. गुड्डूसिंग यांना आपली ती रूम विकायची असल्याने ते त्या ठिकाणी काही दिवसांसाठी राहण्यासाठी आले होते. पण एक आठवड्यापूर्वी रात्री दीडच्या सुमारास गुड्डूसिंग यांच्या घरातून धूर येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी या घटनेची खबर बदलापूर पश्चिम पोलीस आणि अग्निशमन विभागाला दिली होती.

- Advertisement -

पुणे पोलिसांना लागला गुन्ह्याचा सुगावा

पोलीस पथकाला त्यावेळी गुड्डूसिंग याच्या घरात त्यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. चौकशीत गुड्डूसिंग याच्यासोबत त्याची पत्नी सुनीता ही देखील राहण्यासाठी आली होती. पण घटना घडल्यापासून ती त्या ठिकाणाहून पसार झाल्यामुळे पोलिसांना तिच्यावरच अधिक संशय येत होता. त्यामुळे त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. सर्वप्रथम बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली होती. तब्बल एक आठवडा पोलीस सुनीताचा शोध घेत असताना पुण्यातील बंड गार्डन पोलिसांनी बदलापूर पश्चिम पोलिसांना सुनीतापुण्यातील ससून रूग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली.

जळालेल्या पायाने तिने गाठलं पुणे!

गुड्डूसिंगसोबत झालेल्या भांडणात तो रात्री झोपेत असतानाच त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जाळून ठार मारल्यावर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत बेवारस स्थितीत त्याच घरात टाकून ती पळून गेली. पतीला जाळताना तिचा पाय देखील त्या आगीत भाजला होता. बदलापुरहून मध्यरात्री निघून ती थेट पुण्यातील ससून रूग्णालयात उपचारांसाठी दाखल झाली. त्यावेळी बंड गार्डन पोलिसांनी तिच्याकडे केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गुड्डूसिंग यादव याच्या खुनाप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात सुनीताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -