विधानसभा मनसे ५० ते ६० जागा लढणार?

Mumbai
Raj Thackeray
राज ठाकरे यांची घोषणा

लोकसभा निवडणुकीमध्ये ‘लाव रे तो’ व्हिडिओ म्हणणार्‍या राज ठाकरेंच्या मनामध्ये विधानसभा निवडणूक लढवावी की लढू नये, असा संभ्रम सुरू आहे. मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राज ठाकरे निवडणुकीत रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणूक लढू नये, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मत होते.

मात्र, काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतर राज ठाकरे यांचे मन बदलले आहे. मनसेच्या विभागप्रमुखांची शुक्रवारी मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीनंतरच राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती मिळत आहे. मनसेने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय ते ५० ते ६० जागा लढवू शकतील, असे समजते.

त्यात मुंबई, ठाणे, नाशिक, पंढरपूर, वणी येथील जागांचा समावेश असू शकतो. मुंबईतील माहीम, विक्रोळी या भागात देखील मनसे आपला उमेदवार देणार आहे.

हेही वाचा – सेल्फी विथ खड्डा; मनसेचा नवा उपक्रम

काँग्रेस-राष्ट्रवादीची मिळणार मदत?
काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत मनसेने आघाडीत यावे, अशी काही काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा होती; तर काहींचा विरोध होता. मात्र, काँग्रेस सोबत गेलो तर मनसेला आपली पारंपरिक मते देखील नाहीत, असे मत मनसेच्या पदाधिकार्‍यांचे आहे. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत जिथे मनसेचा उमेदवार काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामुळे थोड्या फरकाने पराभूत झाला अशा काही जागांवर आघाडीने उमेदवार न देता मनसेला मदत करावी,अशी मागणी मनसेकडून होत आहे. एवढच नाही तर आघाडीत देखील यावर सहमत असल्याचे समजत आहे.

मुंबई-पुणे नाशिकमधून उमेदवार देणार
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माहीम मतदार संघात मनसेच्या नितीन सरदेसाई यांना सुमारे शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्याकडून ६ हजार मतांनी पराभूत व्हावे लागले होते. सदा सरवणकर यांना त्यावेळी ४६ हजार २९१ तर मनसेच्या नितीन सरदेसाई यांना ४० हजार ३५० मते मिळाली होती. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत माहिम मतदार संघात जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नाही तर मनसेचा विजय सुकर होईल, असे मनसेकडून सांगितले जात आहे. माहिम मतदार संघात मनसेकडून संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि नितीन सरदेसाई हे तिघे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी राज ठाकरे यांना देखील तसे कळवल्याची माहिती मिळत आहे.