महिलांनी उद्ध्वस्त केले अवैध दारूचे अड्डे

Mumbai
अनेक महिला एकत्र येऊन दारूचे अड्डे उध्वस्त करताना

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू अड्डे सुरू आहेत. याबाबत अनेकवेळा पोलीस ठाण्यात तक्रार करुनसुद्धा समस्या सोडवण्यात आली नाही. याला कंटाळलेल्या महिलांनी परिसरातील देशी दारूचे अवैध अड्डे उध्वस्त केले. यावेळी दारू व्यावसायिकांसोबत पोलिसांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप त्यांनी केला.

माळेगावमधील अनेक लोक व्यसनाधीन झाले आहेत. याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो. याची तक्रार करुनही कारवाई न झाल्याने गावातील अनेक महिला एकत्र येऊन त्यांनी दारू अड्यांवरील दारू बाटल्यांची तोडफोड केली. तसेच पोलीस आणि सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून बर्‍याच गावांमधील पुरुष व्यसनाधीन झाले आहेत. आरोग्याचे प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागात असे अवैध दारू विक्रीचे अड्डे मोठ्या प्रमाणात असून याबाबत पोलिसांना वारंवार निवेदन देऊनही अवैध दारू विक्री बंद होत नव्हती, त्यामुळे महिलांनीच अवैध दारू अड्डे उध्वस्त केले. दारू अड्डे जर पुन्हा सुरू झाले तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. याबाबत हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here