घरमहाराष्ट्रमाविम यापुढे बचत गटांची शिखर संस्था

माविम यापुढे बचत गटांची शिखर संस्था

Subscribe

ज्योती ठाकरे यांची घोषणा
शालेय पोषण आहार पुरवण्याचा पर्याय आता महिला बचत गटांनाही खुला झाला आहे. जे बचतगट पोषण आहार पुरवण्यासाठी पात्र ठरतील, अशा सर्व महिला बचत गटांसाठी एका दिवसात प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. महिला आर्थिक विकास महामंडळाचे काम आगामी काळात महिला बचत गटांसाठी शिखर संस्था म्हणून राहणार आहे. माविम सगळ्या महिला बचत गटांसाठी मध्यवर्ती संस्था म्हणून यापुढच्या काळात काम करेल, अशी घोषणा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी केली.

‘आपलं महानगर’ आणि ‘माय महानगर’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘गाथा यशस्विनींची, महिला बचत गटांची’ या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ज्योती ठाकरे यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

- Advertisement -

महिलांच्या आरोग्याविषयी आपण बोलतो. योग्य प्रकारची सॅनिटरी नॅपकिन्स न वापरल्यामुळे अनेक महिलांची गर्भाशये खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. तब्बल ८० टक्केे महिलांची गर्भाशये काढावी लागली आहेत, अशी आकडेवारी आहे. एक महिला साधारणपणे तिच्या संपूर्ण आयुष्यात सरासरी २५ ते २६ हजार सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करते. पण या सॅनिटरी नॅपकिनमध्ये केमिकल्स तसेच प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यापुढे आगामी पिढीसमोर आपण मोठे संकट उभे करत आहोत. पुढच्या पिढीपुढे वंधत्वासारखी समस्या डोके वर काढू शकते, इतके याचे दुष्परिणाम आहेत. सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरानंतर त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. ते कमी करण्यासाठी माविममार्फत केमिकल आणि प्लास्टिकमुक्त नॅपकिन्स बाजारात आणण्यात येणार आहेत. या विघटनशील सॅनिटरी नॅपकीन्सच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी एका कंपनीसोबत सामंजस्य करारही करण्यात आला आहे. उच्च आर्थिक स्तरातील महिलांकडून सध्या अशा पद्धतीचे सॅनिटरी नॅपकिन्स आयात करून वापरले जातात. पण सर्वसामान्य महिलांनाही त्या किमतीत नॅपकिन परवडत नाहीत. त्यामुळे असे सॅनिटरी नॅपकीन परवडणार्‍या किंमतीत इथे उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे, असे ज्योती ठाकरे यांनी सांगितले. अपना सहकारी बँक या कार्यक्रमाचे सहपुरस्कर्ते होते.

कार्यक्रमाचा उद्देश यशस्वी – संजना घाडी
दै. आपलं महानगर हे पहिले वृत्तपत्र आहे ज्यांनी महिला बचत गटांच्या कामाची दखल घेऊन महिलांचा सन्मान करणारा कार्यक्रम आयोजित केला आहे, याचा आनंद आहे. सगळ्या महिलांपर्यंत पोहचण्याचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. कार्यक्रमासाठी उपस्थितांच्या संख्यात्मक हजेरीपेक्षा गुणात्मक हजेरी महत्त्वाची आहे. याठिकाणी बसलेली एक व्यक्ती ही ३०० जणांचे प्रतिनिधीत्व करते. महिला बचत गटांच्या निमित्ताने काय नवीन करता येईल यासाठीचा एक प्रयत्न कार्यक्रमाच्या निमित्ताने करणे हा एक उद्देश ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमातून मिळालेले ज्ञान महिला घरी जाताना सोबत घेऊन जाणार आहेत, हेच या कार्यक्रमाचे यश आणि फलित आहे. या महिलांशी अनेक कुटुंबे जोडलेली आहेत, त्यांच्यापर्यंत या कार्यक्रमातील संदेश नक्कीच पोहचेल असे वाटते. अनेकदा महिला बचत गटांना एखादे प्रमाणपत्र मिळत नाहीत, निविदा प्रक्रियेसाठी यंत्रणा साथ देत नाहीत. अशावेळी पत्रकारांची साथ मिळाली तर नक्कीच तोडगा निघण्यासाठी मदत मिळेल, असा विश्वास महिला बचत गट संघटक संजना घाडी यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

आपला पासपोर्ट तयार ठेवा – चित्रा उबाळे
आपल्याला उद्योजकतेच्या माध्यमातून अनेक देश फिरता येतील, या महत्त्वाकांक्षेने आपला पासपोर्ट तयार ठेवा. परदेशातही नेमक्या कोणत्या वस्तूंची गरज आहे, त्यानुसारच आपल्या विक्रीची योजना तयार ठेवा. नुसत्या सवलती आणि सबसिडी एखाद्या व्यवसायासाठी घेण्यापेक्षा त्यांचा सदुपयोग करणे गरजेचे आहे. अनेकदा महिला बचत गटांना आर्थिक चणचण भासते, किंवा त्याबाबतची पुरेशी माहिती नसते. पण आता राज्य सरकार तसेच केंद्र सरकारचे महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणारे औद्योगिक धोरण आहे. त्यामध्ये विशेष भांडवली अनुदान, वीज दरात अनुदान, कामगार कल्याण सहाय्य यांसारख्या अनेक सवलती उद्योगासाठी घेण्यात येतात. सवलत किंवा सबसिडीसाठी उद्योग करू नका, तर उद्योग करताना या गोष्टींचा पूरक वापर व्हायला हवा. जीएसटी हा उद्योगासाठी फायदा करून देणारा आहे, त्यामुळे कर भरण्यामध्ये कुठेही पोटवाटा काढू नका. दलित चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज (डिक्की) ही संस्था दलितांसोबतच इतर समाजातील उद्योजकांनाही मार्गदर्शन करते. त्यामुळे महिलांनी आपला उद्योग करताना येणार्‍या अडचणींबाबत बोलणे गरजेचे आहे, असे आवाहन डिक्कीच्या अध्यक्षा चित्रा उबाळे यांनी केले.

दै. ‘आपलं महानगर’ने आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट वाटला. या कार्यक्रमामुळे एक यशस्वी उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळाली. तसेच, या कार्यक्रमात उपस्थित राहून स्वतःचे काहीतरी अस्तित्व असावे, इतरांवर अवलंबून न राहता स्वतःचा उद्योग करावा, असे नक्की वाटले.
– सुरेखा मिरल्लू, ताडदेव

या कार्यक्रमामुळे स्वतःच्या पायावर आणि जिद्दीवर उभे राहण्याची प्रेरणा मिळाली. वय कोणतेही असो, एखादा उद्योग करण्याची स्फूर्ती माझ्यासह अनेक महिलांना मिळाली असेल हे मात्र नक्की. त्यामुळे आजही महिला अबला नसून सबला आहे. स्वतःच्या जीवावर नक्की यशस्वी होऊ शकतात, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून पटले.
– माधुरी हिरामनी, कामाठीपुरा ,(कागदी पिशव्या बनवण्याचा उद्योग)

मी एक लघु उद्योजिका असून जीन्सच्या बॅग बनवणे, गणपतीच्या कंठी बनवणे तसेच पापड, लोणची बनवण्याचा माझा उद्योग आहे. मात्र अशाच एका कार्यक्रमातून मला उद्योग करण्याची प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमातून मी स्वतःचा एक उद्योग करू शकते, याची पुन्हा जाणीव झाली
– वर्षा निकम, कामाठीपुरा ,(जीन्स बॅग बनवण्याचा उद्योग)

गाथा यशस्विनींची या कार्यक्रमातून मला एक उद्योजिका म्हणून पुढील वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळाली. सर्वच महिलांनी एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला हवे, आज महिला नक्कीच आपली स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करून दाखवू शकते.
– संपदा भोईर, पालघर ,(श्रमदान महिला बचत गट)

आजच्या कार्यक्रमातून एक उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळाली. आजच्या सर्वच महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळाले.
– मीना सरोज, भांडुप (नंदाई महिला बचत गट)

यशस्विनींच्या प्रेरणादायी यशोगाथा…

समाजातील विरोध, कुटुंबातील नकारघंटा, मार्केटमधील आव्हाने, मर्यादित संसाधने, आर्थिक चणचण अशा सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीतही यशाचा मार्ग शोधणार्‍या महिला बचत गटांच्या यशस्विनींची प्रदीर्घ मुलाखत दै. ‘आपलं महानगर’च्या प्रतिनिधी भाग्यश्री भुवड यांनी घेतली. प्रतिकूल परिस्थितीतही आपले वेगळेपण या महिलांनी सिद्ध केले आहे. ‘गाथा यशस्विनींची, महिला बचत गटांची’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने या यशस्विनींचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्यात आला.

…अन पुरणपोळी पोहोचली अमेरिकेला
पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील एका गावातील महिलांची धडपड आज एक भक्कम उलाढालीच्या रूपात बचत गटाच्या निमित्ताने नावारूपास आली आहे. कोणताही भक्कम पाठिंबा नसताना, पुरूषांचा विरोध असताना एकट्या महिला ग्रामसेविकेच्या पाठिंब्याने आम्ही बचत गटाची सुरुवात केली. अवघ्या 20 रूपयांची बचत करून सुरुवात केली. अगरबत्ती, फिनेल तयार करण्यासाठी आम्हाला प्रशिक्षण मिळाले. बँकेत आम्हाला बोलायला येत नव्हते, पण आम्ही 10 महिला बँकेकडून कर्ज घेऊन उभ्या राहिलो. आता 200 महिला आमच्याशी जोडल्या गेल्या आहेत, असे पालघरमधील प्रणिता अधिकारी म्हणाल्या.

किराणा माल, दुग्ध व्यवसाय, डाळी इत्यादींचा व्यवसाय सुरू केला. पण त्यापुढचे पाऊल म्हणून उद्योग सुरू करण्याचे आम्ही ठरविले. आमच्याकडे डाळ, मुग, तांदूळ आणि कडधान्य होते. कुणीतरी सांगितले ‘शहराकडे चला.’ त्यामुळे आम्ही मुंबईला जायचे ठरविले. माविमने आम्हाला महालक्ष्मी सरसमध्ये आणले. आमच्याकडे सगळे काही होते. पण ते विकायचे कसे हा प्रश्न होता. महालक्ष्मी सरसमध्ये आमच्या स्टॉलकडे कोणीच फिरकत नव्हते. कारण आम्हाला ग्राहकांशी बोलता येत नव्हते. तेव्हा माविमच्या महिलांनी सांगितले की, इतर स्टॉलवरील महिला कशा बोलतात आणि आपला माल विकतात त्याचे अनुकरण करा. आमच्याकडे पहिला ग्राहक आला. आम्ही त्यांना पटवून सांगितले, आम्ही खेड्यातून आलो आहोत. आम्ही पिकवलेले सगळे सेंद्रिय आहे. आम्ही पालघर भागातील आदिवासी भागातही कशी मेहनत घेत हे सगळे कष्टाने पिकवतो, आम्ही कसे सच्चे आहोत हे पटवून द्यायला लागलो.

आम्ही पापड आणि पुरणपोळ्या नेल्या होत्या. इतर महिलांनी जसे लाडू चवीसाठी ठेवले त्या गोष्टीचे अनुकरण करत आम्हीही आमच्या पोळ्या चवीसाठी ठेवल्या. इतर महिलांचे अनुकरण करत पोळ्या चवीला ठेवण्याची गोष्ट आमच्या पथ्यावर पडली. कारण आमच्या पोळ्या अमेरिकेला गेल्या. दुसर्‍या वर्षीही त्या आजी श्रमदान बचत गटाचे नाव शोधत आल्या आणि त्यांनी विचारले, यंदा पोळ्या आणल्या का? तुमच्या पोळ्या माझ्या मुलाला खूप आवडल्या, असे आजी म्हणाल्या. आपण जे काम करतो ते चांगले करतो ही कामाची पोचपावती होती. खेडेगावात महिला मेणबत्तीवर पॅकिंग करतात. महिला आपल्या घरून वाल, कडधान्य, हातसडीचा तांदूळ घेऊन महालक्ष्मी सरसला पोहोचल्या. आपला माल किती संपेल याचा अंदाज नव्हता, परत न्यायचा म्हणजे दोन चार हजार भाडे फुकट जाणार. पण अवघ्या दोन दिवसांतच आमचा माल संपला, असाही आमचा अनुभव आहे, असेही अधिकारी म्हणाल्या.

मुंबईकर महालक्ष्मी सरससारख्या ठिकाणी पिशव्या न घेताच येतात. शहरातील लोक खरेदी करतात, त्याच ठिकाणी पिशव्या घेतात. म्हणून महालक्ष्मी सरसमध्ये पिशव्या शिवून विकण्याचा निर्णय घेतला. पिशवीचा व्यवसाय सुरू केला. पण बाजारपेठेत नकारात्मक प्रतिसाद मिळाला. यात्रेत आम्ही पिशव्या विकल्या. प्लास्टिक बंदीसाठी आम्ही सरकारच्या आधी पुढाकार घेतला. आज पिशवीच्या व्यवसायात 3200 पिशव्यांची ऑर्डर मिळाली ती लालबागच्या राजा मंडळाकडून. कुठे तुमचा लालबाग आणि कुठे आमचा पालघरचा आदिवासी जिल्हा. कुठेतरी गणपतीचा आशीर्वाद होता म्हणूनच आम्ही पिशव्यांचा व्यवसाय मोठा करू शकलो, असेही अधिकारी म्हणाल्या.

१७ हजार महिला एकत्र आहेत
शंभर पुरूष एकत्र राहू शकतात, मात्र दोन महिला एकत्र राहू शकत नाही हा समज चुकीचा आहे. आम्ही 17 हजार महिला एकत्रित काम करतो. स्वतःच्या क्षमतांना सकारात्मक रूपाने पुढे न्यायचे असेल तर आपली स्वप्ने आणि आत्मशक्ती आधी जागृत करा, तसेच आपले ध्येय गाठण्यासाठी अविश्रांत मेहनत घेऊन कष्ट करण्याची तयारी ठेवा. हेच महिला बचत गटाच्या महिलांनी जाणून घेतले तर त्या स्वतःच जीवन जगतील आणि यशस्वी पद्धतीने समृद्ध होऊ शकतील, असे नाशिकच्या अश्विनी बोरस्ते म्हणाल्या.

महिलांनी सुख-दु:खाच्या पलिकडे जाऊन सक्षम कसे व्हावे याची प्रक्रिया म्हणजे बचत गट आहे. २००४ मध्ये आम्ही नाशिक येथे एका बचत गटापासून सुरुवात केली. आता 902 महिला बचत गट एकत्र आले आहेत. नाशिक जिल्हा महिला व बचत गट सहकारी संस्थेच्या माध्यमातून हे बचत गट एकत्र बांधण्यात आले आहेत. या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मदत केली जाते. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून 18 हजार महिलांचा समूह उभा राहिला आहे. या सगळ्या परिवारातून जिजाऊ मार्केटिंग युनिट आम्ही तयार केले आहे. मागे वळून पाहताना आजही कळत नाही की एवढ्या महिला कशा जोडल्या गेल्या. महिलांना पुढे आणायचे हेच ध्येय होते, असेही बोरस्ते म्हणाल्या.

समाज जाणिवेतून बालवाडी, प्रौढ शिक्षण
वयाच्या 14 व्या वर्षी लग्न झाले आणि संसाराच्या व्यापात मी व्यस्त होऊन गेले, शिक्षणाची इच्छा व्यक्त केली तेव्हा आईच्या घरी निघून जा, असे उत्तर मिळाले. शिकण्याची हौस तर होतीच म्हणून शिक्षणात दहा वर्षात अंतर पडल्यानंतरही पुन्हा शिक्षण सुरू केले आणि शिक्षिका बनले. सगळं शिक्षण हे कुणालाही न कळता गपचूप घेतले, पण परीक्षेचा निकाल लागल्यावर सगळ्या गुपिताचा उलगडा झाला. मला आता शिक्षण घेऊद्या, आता मला सोडले तरीही चालेल हे मी बोलून दाखवले. पण कुटुंबातील सगळ्यांनीच मला माझ्या शिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू ठेवण्यासाठी मदत केली. मुलांना घरी शिकवता शिकवता एका खासगी कोचिंग क्लासेसवरही मी शिकवायचे काम करू लागले. पण काहीतरी समाजाला उपयोगी ठरेल असे काम करावे ही जिद्द मनात होती. म्हणूनच बालवाडी आणि प्रौढ शिक्षण वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज माझ्या हाताखाली घडलेली मुले मोठ्या हुद्यावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. माझा आवाज ऐकूनही ते मला लगेच ओळखतात याचे समाधान वाटते, असा अनुभव शालिनी गायकवाड यांनी सांगितला.

गतीमंद मुलांना सांभाळण्याचे आव्हान स्वीकारले
खेडेगावातील मतिमंद मुलांना शहरी भागात मिळतात तशा सुविधा मिळत नाहीत. खेडेगावातील या मुलांना सांभाळणे हे काम खूप आव्हानाचे असते. या मुलांची विशेष गरज ओळखूनच ‘अवनी’ शाळेची 2008 मध्ये सुरुवात झाली. माझी छोटी बहीण मतिमंद होती. पण काही कारणांमुळे तिचे लहान वयातच निधन झाले. माझ्या पालकांना ती गतिमंद आहे हे लक्षात येण्यासाठी थोडा वेळ लागला. पण आपल्या बहिणीसारख्याच इतर मुलांच्या सुविधेसाठी म्हणून या विशेष शाळेची सुरूवात आम्ही केली. आज शाळेत 44 मुले तर 19 मोठी माणसे आहेत. या सर्वांसाठी 13 जणांचा कर्मचारी वर्ग मेहनत घेतो. खेड्यातील मुलांचे संगोपन करणे खूप आव्हानाचे असते, त्यांना ब्रश करण्यापासून ते आंघोळ करण्यासाठी सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात. शहरी भागात मुले जशी एकाच ठिकाणी राहतात ती मानसिकता अजूनही खेड्यात यायला वेळ लागणार आहे, असे प्रतिभा ईरकशेट्टी म्हणाल्या.

रेशनिंगचे दुकान चालवायला घेतले
हुमलादेवी बचत गटाच्या माध्यमातून आमच्या बचत गटाची सुरूवात झाली. शेती किंवा शेतमजूर या आमच्या बचत गटाच्या सदस्या आहेत. आम्ही फिरत्या निधीची संकल्पना बचत गटासाठी राबवली होती. बचत गटाच्या कामाअंतर्गत पापड, लोणचे तयार करण्याचे काम आम्ही हाती घेतले. अनेक शेतमजूर व कष्टकरी महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. पापड, लोणचे व्यवसायासोबतच किराणा मालाचे दुकान भाडे तत्वावर चालवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. या अनुभवातून आमच्या महिलांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास पाहता महिलांनी एकत्र येऊन गावकर्‍यांसाठी 2011 मध्ये रेशनिंगचे दुकान चालवायला घेतले. आता महिला रेशनिंगसारख्या सुविधांच्या माध्यमातून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे, असे अलिबागच्या अमृता ठोंबरे म्हणाल्या.

महिला उद्योजक ही नवी ओळख
महिला बचत गट म्हणजे फक्त पापड, लोणची असा समज आहे. पण ही महिलांची ओळख मागे टाकत महिला उद्योजक म्हणून एक नवीन ओळख द्यायची हा विचार घेऊन आम्ही मार्गदर्शन करायला सुरूवात केली. महिला स्वयंपूर्ण व्हायला हवी हे आमचे उद्दिष्ट आहे. पापड, लोणची हे महिला बचत गटाचे काम मर्यादित न राहता ड्रायव्हिंग, गॅस रिपेअरींग यासारख्या कामासाठी आम्ही प्रशिक्षण देण्याची सुरूवात केली. आज महिलांनी ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेऊन मुंबईत स्वत:चे टेम्पो भाड्याने देण्याची सुरूवात केली आहे. लालबागच्या एका तरुणीने जवळपास 1 हजार मुलींना आपल्यासारखे ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले. ही मुलगी स्वतः सीए परीक्षेचा अभ्यास करणारी होती. शिकलेली गोष्ट वाया जात नाही या भावनेने तिने प्रशिक्षण दिले होते. आता तिचे स्वत:चे मारूती सुझुकी सेंटर आहे ही अभिमानाची गोष्ट आहे, असे आशा मामिडी म्हणाल्या.

-(संकलन ः किरण कारंडे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -