तोंड लपवण्याची वेळ आल्याने चुकीची माहिती – देवेंद्र फडणवीस

तुमच्यात ताकद आणि शक्ती असेल तर वीजबिल माफीची घोषणा करा, असा दिला इशारा

devendra fadanvis

ऊर्जामंत्री नितीन राऊत एकतर अभ्यास करत नाहीत किंवा त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. आता तोंड लपवायची वेळ आल्याने ते चुकीची आकडेवारी सांगत आहेत, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.

आमचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळात स्टेट युटिलिटी मजबूत झाली. त्याच्या आधी परिस्थिती काय होती आणि बावनकुळेंच्या काळात त्याची परिस्थिती काय होती, याची आकडेवारी बावनकुळेंनी प्रसिद्ध केलेली आहे. आपले अपयश लपवण्याकरिता कधी केंद्राकडे बोट दाखवायचे, तर कधी गेल्या सरकारकडे बोट दाखवायचे. तुमच्यात ताकद आणि शक्ती असेल तर वीजबिल माफीची घोषणा करा, नाहीतर घोषणा करू नका, असे थेट आव्हान देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला दिले आहे.

गुपकर आघाडीत काँग्रेस

जम्मू-काश्मीरमध्ये भारतविरोधी शक्ती तिथल्या विविध राजकीय पक्षांसोबत हातमिळवणी करुन तिथे पुन्हा एकदा कलम 370 लागू झाला पाहिजे, अशाप्रकारचा प्रयत्न करत आहेत. तिथे पुन्हा कलम 370 लागू व्हावे, यासाठी तेथील अनेक पक्षांचं एकत्रिकरण झालं आहे. या गुपकर आघाडीत काँग्रेसदेखील सहभागी झाली आहे. काँग्रेसला मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही ज्या आघाडीत सामील झाले आहेत त्याचा अजेंडा तुम्हाला मान्य आहे का?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांचा अजेंडा हा चीनच्या मदतीने कलम 370 पुन्हा लागू करण्याचा आहे. ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते असे नेते चीनच्या मदतीने कलम 370 लागू करण्याबाबत भाष्य करतात, याचे मला आश्चर्य वाटते. दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती राष्ट्रीय झेंडा काश्मीरमध्ये लागू देणार नाही, अशाप्रकारचे वक्तव्य करतात. अशा लोकांच्या आघाडीत काँग्रेस सहभागी होत असेल तर आम्ही रोज काँग्रेसला प्रश्न विचारु. देशासमोर काँग्रेसला उघडे पाडण्याचे काम करू, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

३७० कलम लागू होणार नाही

देश तोडण्याची भाषा करणार्‍या गुपकर अलायन्सचा अजेंडा तुम्हाला मान्य आहे का?, असा सवाल करतानाच आता काहीही झाले तरी जम्मू आणि काश्मीरमध्ये 370 कलम लागू होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मनसेची आज महत्त्वपूर्ण बैठक

वाढीव वीज देयकांच्या विषयावर गुरुवारी मनसेची महत्त्वपूर्ण बैठक असून, नेते आणि सरचिटणीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी दुपारी 2 वाजता मनसे पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. वाढीव वीज देयकांवर घेतलेल्या यू-टर्नवर सरकारला घेरण्यासाठी बैठकीत आंदोलनाची व्यूहरचना ठरण्याची शक्यता आहे.